* अक्षय ऊर्जा क्षेत्राला मिळणार मोठी गती
मुंबई, 09 मार्च (हिं.स.) – भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्राला मोठी गती देण्यासाठी चेन्नई येथील ‘एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ (SRMIST) ने एका महत्त्वपूर्ण ‘डीप-टेक’ सौर तंत्रज्ञानाचे विस्तारीकरण करीत विद्यापीठाने विकसित केलेले सौर सेल ‘एनकॅप्सुलंट’ (संरक्षक कवच) तंत्रज्ञान अॅनाबॉन्ड लिमिटेड या नामांकित कंपनीला हस्तांतरित करण्यात आले आहे. या करारांतर्गत विद्यापीठाला १ कोटी रुपये आगाऊ रक्कम आणि पुढील सात वर्षे उत्पादनाच्या विक्रीवर ठराविक रॉयल्टी मिळणार आहे.
भारताने २०३० पर्यंत ५०० गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रवासात सौर पॅनेलचे आयुष्य आणि त्यांची कार्यक्षमता टिकवून ठेवणे मोठे आव्हान असते. एस आर एम इन्स्टिट्यूटच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा. के. अनंथनारायणन आणि त्यांच्या चमूने ४-५ वर्षांच्या संशोधनानंतर हे विशेष पॉलिमर तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान सौर पॅनेलला आर्द्रता, अतिनील किरणे आणि धुळीपासून वाचवते, ज्यामुळे पॅनेल २५ ते ३० वर्षे विनासायास काम करू शकतात.
या यशावर बोलताना संबंधित तंत्रज्ञान इन्स्टिट्यूट चे प्रो-चांसलर डॉ. पी. सत्यनारायणन म्हणाले की, केवळ ज्ञान मिळवणे पुरेसे नसून, त्याचे रूपांतर प्रत्यक्ष समाजाला उपयोगी पडणाऱ्या उपायांमध्ये होणे आवश्यक आहे. जेव्हा उद्योग जगत विद्यापीठातील संशोधनाचा स्वीकार करते, तेव्हाच शैक्षणिक उपक्रमांचा खऱ्या अर्थाने प्रभाव दिसून येतो.
कुलगुरू प्रा. सी. मुथमिळचेलवन यांनी सांगितले की, विद्यापीठ आता मूलभूत संशोधनाकडून ‘ट्रान्सलेशनल रिसर्च’ (उपयोजित संशोधन) कडे वळले आहे. अॅनाबॉन्ड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक एम. राजन यांनी या तंत्रज्ञानामुळे सौर ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी क्रांती होईल, असा विश्वास व्यक्त केला. हे पाऊल ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी देणारे ठरणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी
