मुंबई, 8 ऑक्टोबर : गोदरेज ग्रुपने मुंबई फर्स्टच्या सहयोगाने सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट अवॉर्ड सुरु करत असल्याची घोषणा आज केली. पर्यावरण आणि शाश्वतता या क्षेत्रांमध्ये, विशेषतः मुंबईत, लक्षणीय उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी हा विशेष उपक्रम सुरु करण्यात आला आहे. श्री. सोहराब पिरोजशा गोदरेज यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या प्रवर्तक कार्याची सन्मानपूर्वक आठवण म्हणून सुरु करण्यात आलेला हा प्रतिष्ठित पुरस्कार पर्यावरणप्रेमींच्या पुढच्या पिढीला प्रेरणा देऊन त्यांचा वारसा पुढे चालवण्याचा एक उपक्रम आहे.
सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्कारामध्ये काही महत्त्वपूर्ण उद्दिष्ट्ये आखण्यात आली आहेत. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये शाश्वत पर्यावरण प्रकल्पांचे नेतृत्व करणाऱ्या प्रवर्तकांचा सन्मान करण्याबरोबरीनेच, पर्यावरणाप्रतीच्या जबाबदारीचे पालन करण्यासाठी विशिष्ट सवयींचा स्वीकार केला जावा, सर्वोत्तम प्रथांची माहिती सर्वत्र पोहोचावी व त्यांचा अवलंब करण्याची प्रेरणा दिली जावी हा देखील हा पुरस्काराचा उद्देश आहे. पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये केल्या जात असलेल्या प्रभावी प्रयत्नांचा सन्मान करणे हे देखील या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.
सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट पुरस्काराच्या मूल्यमापन निकषांमध्ये प्रभाव, नेतृत्व आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धनाप्रती बांधिलकी यासारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. समुदायाचा सहभाग, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, समर्थन व पाठिंबा मिळवण्यासाठीचे प्रयत्न, उपक्रमांची व्याप्ती पुढे वाढवली जाण्याची क्षमता, शैक्षणिक पोहोच आणि विज्ञान-आधारित दृष्टिकोन हे मुद्दे देखील विचारात घेतले जाणार आहेत.
गोदरेज इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री. नादिर गोदरेज यांनी सांगितले, गोदरेजमध्ये आम्ही पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी वचनबद्ध आहोत कारण आम्ही असे मानतो की, पर्यावरण संरक्षण व संवर्धन हा पर्याय किंवा आपल्या आवडीनिवडीचा भाग नाही तर एक महत्त्वाची जबाबदारी आहे जी आपण सर्वांनी मिळून पार पाडली पाहिजे. सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट अवॉर्ड आमच्यासाठी खूप खास आहे. लोक, आपली पृथ्वी, नफा यांच्याप्रती आमच्या सातत्यपूर्ण समर्पणाचे हे प्रतीक आहे, या पुरस्काराच्या माध्यमातून आम्ही महान पर्यावरणवादी सोहराब पिरोजशा गोदरेज यांना श्रद्धांजली वाहत आहोत. पर्यावरणाच्या रक्षणासाठी अथक परिश्रम करणाऱ्या अतुलनीय व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करताना आम्हाला खूप आनंद होईल. आपण सर्वांनी मिळून या ‘एन्व्हायरन्मेंट चॅम्पियन्स’ ना पाठिंबा देऊ या, त्यांच्या लक्षणीय प्रयत्नांमधून प्रेरणा घेऊन भविष्यातील पिढ्यांसाठी अधिक चांगले विश्व उभे करू या.
एफआरएस, नॅशनल इन्नोव्हेशन फाऊंडेशनचे भूतपूर्व अध्यक्ष, सीएसआयआरचे माजी डायरेक्टर-जनरल आणि सोहराब पिरोजशा गोदरेज एन्व्हायरन्मेंट अवॉर्डचे ज्युरी सदस्य डॉ. रघुनाथ माशेलकर, एफआरएस यांनी सांगितले, सोहराब पिरोजशा गोदरेज हे एक असे द्रष्टे व प्रेरणादायी नेते होते ज्यांनी स्वतःच्या काळाच्या पुढे जाऊन विचार केला. शाश्वत भवितव्यासाठी पर्यावरण संरक्षण व संवर्धन महत्त्वाचे असल्याचा त्यांचा संदेश त्यांच्या स्मृती कायम जागृत ठेवेल. पर्यावरण संरक्षणार्थ केल्या जाणाऱ्या कार्याचा सन्मान करण्यासाठी दिला जाणार असलेला हा पुरस्कार भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
मुंबई फर्स्टचे व्हाईस चेअरमन श्री. रॉजर सी बी परेरा यांनी सांगितले, श्री. सोहराब पिरोजशा गोदरेज हे स्वतःच्या काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे, दूरदर्शी नेते होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य, आपला वेळ, पैसा व प्रतिभा पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठीच्या कार्याला अर्पण केले होते. अक्षरशः २४X७ ते या कार्यासाठी झटत असत. या महान पर्यावरणवादी, प्रेरणादायी नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबई फर्स्टतर्फे केल्या जात असलेल्या प्रयत्नांना श्री. नादिर गोदरेज यांनी संपूर्ण पाठिंबा दिला आहे, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
