नवी दिल्ली, 29 जुलै (हिं.स.)। अमेरिका आणि चीनमधील चालू टॅरिफ चर्चांमुळे असलेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतातून अमेरिकेत होणाऱ्या स्मार्टफोन निर्यातीला मोठा चालना मिळाला आहे. २०२५च्या दुसऱ्या तिमाहीत भारताने अमेरिकेत निर्यात होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये ४४ टक्क्यांचा वाटा घेतला असून, यात सर्वाधिक भागीदारी अॅपलची आहे.
कॅनॅलिसच्या नव्या अहवालानुसार, चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या स्मार्टफोन शिपमेंटचा वाटा गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीत ६१ टक्के होता, तो आता घसरून केवळ २५ टक्क्यांवर आला आहे. दुसरीकडे भारतातून निर्यात होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये वर्षभरात तब्बल २४० टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी केवळ १३ टक्क्यांपर्यंत असलेला भारताचा वाटा यंदा ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
कॅनॅलिसचे प्रमुख विश्लेषक संयम चौरसिया यांनी सांगितले की, “अमेरिकेसाठी होणाऱ्या स्मार्टफोन उत्पादनात भारत प्रथमच आघाडीवर आला आहे. याचे मुख्य श्रेय अॅपलच्या पुरवठा साखळीतील ‘चायना प्लस वन’ धोरणामुळे भारतात झालेल्या उत्पादन वाढीला जाते.”
चौरसियांच्या मते, अॅपलने २०२५ मध्ये भारतातून प्रामुख्याने अमेरिका बाजारासाठी निर्यात सुरू केली आहे. कंपनीने आयफोन १६ सिरीजच्या ‘प्रो’ मॉडेलचे उत्पादन भारतात सुरू केले आहे. मात्र अद्याप ‘प्रो’ मॉडेलच्या मोठ्या प्रमाणातील पुरवठ्यासाठी अॅपल चीनवरच अवलंबून आहे.
याशिवाय, सॅमसंग आणि मोटोरोला यांनीही भारतातून अमेरिकेसाठी स्मार्टफोन पुरवठ्यात वाढ केली आहे. मात्र, अॅपलच्या तुलनेत त्यांची गती आणि प्रमाण कमी आहे. मोटोरोला अजूनही मुख्यत्वे चीनमधील युनिटवर अवलंबून आहे, तर सॅमसंगने व्हिएतनाममधील उत्पादन केंद्रावर भर दिला आहे.
अहवालानुसार, अॅपलने भारतात सध्या ४ कोटी युनिट्सचे उत्पादन सुरू केले आहे आणि २०२६ पर्यंत ते ८ कोटी युनिट्सपर्यंत वाढवण्याची योजना आहे. यामुळे भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule
