वाल्मिकी रामायण हे अधिकृत रामायण म्हणून ओळखले जाते. वाल्मिकी रामायण केवळ ऐतिहासिक काव्य नसून मानवाचा जीवन मार्ग उजळणारा तो एक महान दीपस्तंभ आहे. या रामायणात सागराची गंभीरता, गंगेची पवित्रता आणि हिमालयाची उत्तुंगता आहे…..वाल्मिकी ऋषींनी लिहिलेले रामायण आदिमहाकाव्य म्हणून गौरवले आहे. वाल्मीकी रामायण वाचून अन्य रामायणे म्हणजे राम नसलेली रामायणे आहेत.
रामा वाचून रामायण म्हणजे सुरावाचून संगीत, प्रेमावाचून प्रेमविवाह, शब्दावाचून साहित्य, चंद्रावाचून चांदणे आणि गळ्यावाचून गाणे होय! वाल्मिकी रामायणात खरा राम आहे. काहींनी राम समजून न घेता कपोलकल्पित कल्पनांच्या भराऱ्या मारून रामकथेच्या सांगाड्यात आपल्या कल्पनांचा येथेच्छ पेंढा भरून रामकथा सांगितली आहे. असे न्यायाधीश राम केशव रानडे म्हणतात. (संदर्भ- रामायणातील व्यक्तिदर्शन, लेखक-न्यायाधीश राम केशव रानडे, पृष्ठ ३)
न्यायाधीश राम केशव रानडे म्हणतात त्याप्रमाणे आव्हाडांनी कथन केलेला श्रीराम हा वाल्मिकी रामायणातला राम नाही. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या कल्पनेचापेंढा भरून निर्माण झालेल्या राम कथेतील रामाचे त्यांनी वर्णन केले आहे. म्हणून या लेखाचे शीर्षक आव्हाडांचे राम नसलेले रामायण असे दिले आहे.
वाल्मिकी रामायणाच्या आधारे श्रीराम मांसाहार करत नव्हते हे सिद्ध करता येते.
श्रीरामचंद्रांना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला. लक्ष्मण आणि सीतेसह त्यांनी तो वनवास भोगला. श्रीराम आणि चित्रकूट पर्वतावर वास्तव्य करायचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी लक्ष्मणाला तिथे पर्णकुटी बांधण्यास सांगितले. पूर्ण कुटी बांधून झाल्यावर वास्तुशांती करण्याच्या हेतूने सर्व सिद्धता करण्यात आली. वास्तुशांती का करायची याचे कारण सांगताना श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले,
*कर्तव्यं वास्तुशामनं सौमित्रे चिरंजीविभि: ।*
दीर्घ जीवनाची इच्छा करणाऱ्या पुरुषाने वास्तुशांती अवश्य केली पाहिजे.
वाल्मीकी रामायण अयोध्याकांड सर्ग ५६ श्लोक २२ आणि २३ या दोन श्लोकांचा शब्दशः अर्थ घेतला तर गोंधळ उडतो. म्हणजेच अर्थाचा अनर्थ होतो. आपण ते दोन श्लोक आणि त्याचा नेमका अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.
ऐणेयं मांसमाहृत्य,
शालां यक्ष्मामहे वयम् ।
कर्तव्यं वास्तुशामनं,
सौमित्रे चिरंजीविभि: ।।२२।।
भावार्थ – सुमित्रा कुमार! आपण गजकंद घेऊन त्याच्या पर्णशालाने अधिष्ठात्री देवतांचे पूजन करूया. कारण दीर्घ जीवनाची इच्छा बाळगणाऱ्या पुरुषाने वास्तुशांती अवश्य केली पाहिजे.
या श्लोकात *ऐणेयं मांसम्* असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. संस्कृत मध्ये या शब्दप्रयोगाचा अर्थ गजकंद नावाचा कंद असा आहे. त्यामुळे येथे मांस याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही.
याचे कारण असे की श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाई हे भरद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले होते. त्यावेळी श्रीरामांनी त्यांना सांगितले, वडिलांच्या आज्ञेप्रमाणे आम्ही तिघेही फलाहार करून धर्माचरण करणार आहोत.
त्यामुळे वडिलांना दिलेले वचन तंतोतंत पाळणारे श्रीराम मांसाहार करतात असे होणार नाही. श्रीराम एक वचनी होते. सत्यवचनी होते. त्यामुळे मृग या शब्दाचा अर्थ गजकंद असाच घेतला पाहिजे.
मृगं हत्वाऽऽनय क्षिप्रं,
लक्ष्मणेह शुभेक्षण ।
कर्तव्य: शास्त्रदृष्टो हि,
विधिर्धममनुस्मर ।।२३।।
भावार्थ – कल्याणदर्शी लक्ष्मणा! तू गजकंद नावाच्या कंदाला उपटून किंवा खणून लवकर आण. कारण शास्त्रोक्त विधीचे अनुष्ठान आपल्यासाठी आवश्यक कर्तव्य आहे. तू सदैव धर्माचे चिंतन कर.
मदनपाल निघण्टु नुसार मृग या शब्दाचा अर्थ गजकंद असा आहे. गजकंद रोग निवारण करणारे कंद आहे. याचा उपयोग वैद्यकीय शास्त्रात केला जातो. विशेषतः त्वचारोग किंवा कुष्ठरोग दूर करण्यासाठी हा गजकंद उपयुक्त आहे. (संदर्भ-वाल्मीकी रामायण, आयोध्याकांड, स्वर्ग ५६ पृष्ठ ३९५ वरील तळ टीप )
तसेच संपूर्ण रामायणात श्रीराम मांसाहारी होते असा कोठेही उल्लेख आढळत नाही.
सर्वांना ज्ञात असलेले श्रीरामांचे स्तोत्र म्हणजे श्री रामरक्षा स्तोत्र होय. या श्री रामरक्षा स्तोत्रातील श्लोक १८ मध्ये श्रीराम आणि लक्ष्मण कंदमुळे खात होते असे स्पष्टपणे सांगणारा आहे.
तसेच सर्व प्राण्यांना अभय देणारे असे श्रीरामांचे वर्णन श्री रामरक्षा स्तोत्रातल्या १९ व्या श्लोकात करण्यात आले आहे.
जे श्रीराम सर्व प्राण्यांना अभय देतात आणि केवळ फळे आणि कंदमुळे हा ज्यांचा आहार आहे. तरी सुद्धा श्रीराम मांस भक्षण करत होते असे म्हणणे म्हणजे आपल्या बुद्धीचे दिवाळे वाजले आहे असे मान्य करणे होय.
श्रीरामांसारख्या पुरुषोत्तमचा अधिकृत असलेला ग्रंथ म्हणजे श्रीवाल्मिकी रामायण होय. अशा ग्रंथाचा सखोल अभ्यास करायचा नाही. आपल्या मनाला वाटेल तसे वक्तव्य करायचे. आपण जे वक्तव्य करतो ते कोणत्या ग्रंथाच्या आधारे केले आहे हे सांगण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे नाही.
शरीर शास्त्राच्या दृष्टीने विचार केला तरीही मानव प्राणी हा निसर्गतः शाकाहारी आहे. मानवाची शरीराची रचना ही शाकाहारी प्राण्यांच्या शरीराप्रमाणे आहे. शाकाहारी प्राणी हे मांसाहारी प्राण्यांप्रमाणे द्रव पदार्थ जिभेने चाटून प्राशन करत नाहीत. सर्व शाकाहारी प्राणी पाणी घोटा घोटाने पितात. शाकाहारी प्राण्यांचे डोळे गोलाकार नसून निमुळते आहेत. मांसाहारी प्राण्यांचे डोळे गोलाकार असतात. मांसाहारी प्राण्यांचे दात आणि शाकाहारी प्राण्यांचे दात सारखे नाहीत. त्यामुळे निसर्गतः माणूस शाकाहारी आहे. म्हणूनच आपल्या हिंदू संस्कृतीत मांसाहार निषिद्ध मानला आहे.
ही गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही.
रामायण काळात निसर्ग नियमांचे पालन काटेकोरपणे केले जात होते. निसर्ग नियमांचे पालन काटेकोरपणे केले नाही तर नैसर्गिक समतोल ढासळतो आणि नैसर्गिक आपत्ती निर्माण होते. रामायण काळात कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्याचे वर्णन आढळत नाही. निसर्गाचा समतोल ढासळला नाही याचे वर्णन वाल्मिकींनी रामायणात केलेले आढळते.
वसतस्तस्य रामस्य,
वने वनचरै: सह ।
भावार्थ-वनात वनचरान समवेत राहणारे श्रीराम.
(बालकांड प्रथम सर्ग श्लोक ४३ चा उत्तरार्ध)
वनचरांसमवेत राहणारे श्रीराम याचा अर्थ वनातील प्राण्यांसमवेत श्रीराम सहजीवन जगत होते, असा होतो.
थोडक्यात जितेंद्र आव्हाड सांगतात ते राम नसलेले रामायण आहे.
– दुर्गेश जयवंत परुळकर
व्याख्याते आणि लेखक
९८३३१०६८१२
हिंदुस्थान समाचार
