मुंबई, ६ ऑक्टोबर (हिं.स.) : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा मेल आला आहे. ज्यात धमकी देणाऱ्याने सरकारकडे ५०० कोटी आणि गुंड लॉरेन्स बिष्णोईची मागणी केली आहे. तसे न केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या नावे असलेल्या स्टेडिअमवर घातपात करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मेल आयडीवर धमकीचा मेल आला आहे. सदर घटना गंभीर असून सायबर पोलिसांच्या मदतीने पोलीस अधिक तपास करत आहेत.
या मेलमध्ये म्हटले आहे की, भारतात सगळं काही विकलं जातं, त्यात आम्हीही काही तरी विकत घेतलंय. कितीही सुरक्षा वाढवा, आमच्यापासून तुम्ही वाचू शकत नाही. चर्चा पुढे सुरू ठेवायची असल्यास याच मेलवर उत्तर करण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांसह काही नेत्यांना आणि मंत्र्यांना देखील याआधी धमकीचे मेल आणि फोन आले आहेत. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्याचे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.
हिंदुस्थान समाचार
