आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासीक कामगिरी
हँगझोऊ, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : चीनच्या हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचला आहे. सुवर्णपदक लढतीत भारताने 2018 च्या सुवर्णपदक विजेत्या जपानचा 5-1 असा पराभव केला आहे.
या विजयासह टीम इंडियाने तब्बल 9 वर्षांनंतर या खेळांमध्ये हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. 2014 च्या इंचॉन आशियाई स्पर्धेत भारताने शेवटच्या वेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याच वेळी, 2023 आणि 2014 पूर्वी भारतीय पुरुष हॉकी संघाने 1966 आणि 1998 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. चार सुवर्णांव्यतिरिक्त, भारतीय संघाने 1958, 1962, 1970, 1974, 1978, 1982, 1990, 1994, 2002 आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर 1986, 2010 आणि 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते.
हिंदुस्थान समाचार
