मुंबई, 27 नोव्हेंबर, (हिं.स.)। बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीसोबतच देश-विदेशातील लाखो चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धर्मेंद्र यांच्या पत्नी व अभिनेत्री हेमा मालिनी यांनी पतीच्या आठवणीतून सोशल मीडियावर एक अत्यंत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
धरम जी माझ्यासाठी सर्वकाही होते — हेमा मालिनी
हेमांनी धर्मेंद्र यांचा एक जुना फोटो शेअर करत लिहिले, “धरम जी माझ्यासाठी खूप काही होते. माझे प्रेमळ पती, आमच्या मुली ईशा आणि अहानाचे लाडके वडील, माझे मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक, कवी… गरज भासली की नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे व्यक्तिमत्त्व. खरं सांगायचं तर, ते माझ्यासाठी संपूर्ण जग होते. चांगल्या-वाईट काळात त्यांनी मला कधीही एकटे पाडले नाही. ते आमच्या कुटुंबातील प्रत्येकासाठी अत्यंत प्रिय होते आणि सर्वांवर त्यांनी मनापासून स्नेह ठेवला.”
त्या पुढे म्हणाल्या, “लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असूनही त्यांची नम्रता वेगळीच होती. त्यांची प्रतिभा, लोकप्रियता आणि साधेपणा यांमुळे ते दिग्गजांमध्येही विशेष ठरले. चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी अपरिमित आहे. त्यांच्या जाण्याने मनात निर्माण झालेले रिक्त स्थान आयुष्यभर भरणार नाही. एवढ्या मोठा सहवासानंतर आता हातात उरल्या त्या फक्त आठवणी…”
दीर्घकाळ आजारी होते धर्मेंद्र
धर्मेंद्र यांची तब्येत गेल्या काही महिन्यांपासून बिघडली होती. प्रकृती गंभीर झाल्यावर त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी कुटुंबीय त्यांना जुहू येथील निवासस्थानी घेऊन आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र २४ नोव्हेंबरच्या सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला.
—————
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर
