पुणे, 10 सप्टेंबर, (हिं.स.)। राज्यातील पुनर्वसित गावांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. याच धर्तीवर राजेगाव (ता. दौंड) परिसरातील गावठाणामध्ये स्थलांतरित झालेल्या राजेगाव गावठाण, कोशिमघर आणि शिंगोबामाळ तीन पुनर्वसित गावांमधील सुविधांची पाहणी नुकतीच करण्यात आली.
पाटबंधारे विभागाचे सरताज मुल्ला, मंडळ अधिकारी महेंद्र भोई आणि ग्राम महसूल अधिकारी धनंजय डोंगरे त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पाहणी करून गावातील सध्याची परिस्थिती आणि गरजा जाणून घेतल्या. या पाहणीमुळे अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतिक्षेत असलेल्या गावकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
पाहणी दरम्यान, गावातील उपलब्ध आणि अनुपलब्ध सोयीसुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पाणी, वीज, गटार व्यवस्था, अंतर्गत रस्ते, दवाखाना, सार्वजनिक शौचालय, मैदानाची जागा, स्मशानभूमी, चावडी, समाजमंदिर, बस स्थानक, पाणी टाकी, शेतजमिनीसाठीचे रस्ते आणि मुलांना खेळण्यासाठी मैदान अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. विशेषतः बाजारपेठ आणि माळरानासारख्या काही महत्त्वाच्या सुविधांचा अभाव यावेळी प्रकर्षाने दिसून आला.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
