नवी दिल्ली, ०४ सप्टेंबर (हिं.स.). भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा एएफसी आशियाई कप २०२६ पात्रता फेरी गट-क सामना आता बंगळुरूऐवजी गोव्यात खेळवण्यात येणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने ही माहिती दिली आहे. हा सामना १४ ऑक्टोबर रोजी फातोर्डा येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणार आहे.
ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय विंडोमध्ये भारत आणि सिंगापूर दोन सामने खेळणार आहे. या दोन सामन्यातील पहिला सामना ९ ऑक्टोबर रोजी सिंगापूरच्या कलंग येथील राष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या टप्प्यासाठी गोव्याला रवाना होतील.हा सामना पूर्वी बंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर होणार होता. पण लॉजिस्टिक समस्यांमुळे गोव्यात हलवण्यात आला आहे. कर्नाटक राज्य फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष एनए हॅरिस म्हणाले, कांतिरावा स्टेडियमचा वापर ऍथलेटिक्ससह अनेक खेळांसाठी केला जातो. फुटबॉल सामन्यासाठी मैदान तयार करण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे. हा सामना अचानक आमच्याकडे देण्यात आला. सामना दुसरीकडे हलवण्यात आल्याचे आम्हाला दुःख आहे. पण ते आमच्या हातात नाही. हॅरिस पुढे म्हणाले की, लवकरच बंगळुरूमध्ये एक नवीन आधुनिक फुटबॉल स्टेडियम बांधले जाईल.
तिसऱ्या फेरीच्या पात्रता फेरीत भारताला अजूनही विजय मिळवता आलेला नाही. भारतीय संघाने प्रथम बांगलादेशसोबत 0-0 अशी बरोबरी साधली आणि नंतर हाँगकाँगकडून 0-1 असा पराभव पत्करावा लागला. हा सामना प्रशिक्षक मनोलो मार्केझ यांचा शेवटचा सामना होता. त्यानंतर खालिद जमील यांनी संघाची धुरा स्वीकारली आहे.—————-
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
