अमरावती, 26 ऑगस्ट (हिं.स.) तालुक्यातील मौजा देऊतवाडा, चैनपुर शेतशिवारात फिर्यादी आणि आरोपी यांचे शेत असून शिवरास्त्याच्या वादातून आरोपीनी फिर्यादी शेतकऱ्यासोबत वाद घालून जबर मारहाण केली. या घटनेची तक्रार वरुड पोलिसस्टेशनला दिल्यावरून पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.
राहुल रमेश राऊत (३५), रोषन रमेश राऊत (३३), मंगेश पुंडलिकराव राऊत (४०), पुंडलिक महादेवराव राऊत (७५), रमेश महादेवराव राऊत (६९) सर्व रा. देऊतवाडा अशी आरोपींची नावे आहे. सदर मौजा देऊतवाडा शेतशिवारात फिर्यादी नीळकंठ विश्वनाथ विधाते (६०) रा. देऊतवाडायांची १२ एक्कर शेतजमीन आहे. यापैकी नीळकंठ यांच्या पत्नीच्या नावे साडेचार एक्कर शेतजमीन आहे. मौजा देऊतवाडा आणि मौजा चैनपूर शेतशिवाराचा शिवरस्ता लागून आहे. फिर्यादीचे शेताला मौजा चैनपूर शिवारात आरोपी रमेश राऊत यांचे शेत लागून आहे. गेल्या तीन आठवड्यापासून आरोपीचा फिर्यादींसोबत वाद सुरु आहे. आरोपी रमेश राऊत यांनी शिवरस्ता बंद केल्याने या शिवरस्त्यावरून जाणे-येणे बंद झाल्याने तहसील कार्यालयात तक्रार दिली होती. तक्रारीवरून शिवरस्त्याची पाहणी करण्याकरिता मंडळ अधिकारी गेडाम, तलाठी दिनेश राऊत तसेच कोतवाल सचिन थोटे यांनी २१ ऑगस्टला प्रत्यक्ष मोका पाहणी करून अहवाल तयार केला.
यानंतर फिर्यादी घरी जात असताना आरोपींनी येऊन शिव रस्त्याच्या कारणावरून शिवीगाळ सुरु केली, तर मारण्याकरिता अंगावर धावून धक्काबुक्की करून थापड मारून मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा पुतण्या मध्यस्थी करण्यास गेला असता त्यालाही मारहाण केली, तर आरोपी राहुल रमेश राऊत याने हातात असलेला विळा फिर्यादीच्या कपाळावर मारल्याने जखमी झाले. या घटनेची तक्रार निळकंठ विधाते यांनी वरुड पोलिसस्टेशनमध्ये दाखल केली असता पोलिसांनी सर्व पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या २०२३ नुसार कलम १८९ (२) १८९ (४), १९१ (२) (३), १९०, ११८ (१) ११५,३५२, ३५१(२) (३)नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलिस करीत आहे
—————
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी
