नाशिक, 22 ऑगस्ट (हिं.स.) : क्रीडा व युवक सेवा संचालनलय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या सहकार्याने नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे नाशिक महानगर परिसरातील शाळांच्या आंतर शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत आज १७ वर्षे मुलींच्या स्पर्धा खेळविल्या गेल्या.
या गटात १०२ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी सर्वेश देशमुख आणि क्रीडा प्रशिक्षक तथा कॅरम स्पर्धेच्या प्रमुख प्रीती करावा यांच्या हस्ते कॅरम फोडून करण्यात आले. यावेळी क्रीडा संघटक आनंद खरे, यशवंत ठोके, भरत खत्री, भुषण भटाटे, अभिषेक मोहिते, नकुल चावरे आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेत चुरशीच्या अंतीम सामन्यात नाशिकच्या पुष्पावती कन्या शाळेची प्राची मनवर हीने नाशिक रोड येथील र.ज. बिटको कन्या शाळेच्या तनुजा गाढवे हीचा १६-९, १४-८ आणि १२-४ असा २-१ ने पराभव करून विजेतेपद पटकावले. पुष्पावती कन्या शाळेच्या चैत्राली वाटाणे हीने तिसरा, रवींद्रनाथ विद्यालयच्या गौरी तेलगड हीने चवथा, इंग्लिश मिडीयम स्कूल, सिडकोच्या वैभवी चिंताकिंदी आणि स्वरा अहिरे यांनी अनुक्रमे पाचवा आणि सहावा क्रमांक मिळविला. या सहा खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विजयी खेळाडूंचे क्रीडा अधिकारी भाऊसाहेब जाधव, उत्तरा खानापुरे, आणि प्रीती करावा यांनी अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेमध्येही चांगला खेळ करून राज्य स्पर्धेमध्ये सहभाग मिळवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भुषण भटाटे, अभिषेख मोहिते, भरत खत्री, नकुल चावरे, उत्कर्ष परदेशी, यश अहिरे, गायत्री पवार, यश कुमावत आदी परिश्रम घेत आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV
