इस्लामाबाद, 19 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये आज, मंगळवारी सकाळी १०:२० वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात, जमिनीत १९० किलोमीटर खोल होते. या भूकंपाचा परिणाम इस्लामाबाद, रावळपिंडी आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर, स्वात, चितराल आणि अॅबटाबाद या भागांमध्ये जाणवला. ही माहिती पाकिस्तान हवामान विभाग (पीएमडी) च्या हवाल्याने देण्यात आली आहे.
पंजाब प्रांताच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, भूकंपाचे धक्के बहावलपूर, डेरा गाझी खान, फैसलाबाद, गुजरांवाला, गुजरात, लाहोर, मुलतान, साहीवाल आणि सरगोधा विभागांमध्येही जाणवले.आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ‘रेस्क्यू 1122’ चे प्रवक्ते बिलाल फैजी यांनी सांगितले की, सध्या कोणतीही अडचण किंवा आपत्तीची बातमी आलेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान तीन प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्स अरबी, युरो-एशियाई आणि भारतीय प्लेट्स यांच्या संधिस्थानी स्थित आहे. त्यामुळे येथे भूगर्भीय हालचाली सतत होत असतात.
हिंदूकुश परिसराला जगातील सर्वात सक्रिय भूकंपीय क्षेत्रांपैकी एक मानले जाते. या महिन्याच्या सुरुवातीला इस्लामाबाद, रावळपिंडी आणि आसपासच्या भागांमध्ये ५.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारती हलल्या होत्या.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
