गंभीर दुखापत झाल्यास बदली क्रिकेटपटूला संधीनवी दिल्ली, 16 ऑगस्ट (हिं.स.) :भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देशांतर्गत क्रिकेटसाठी काही नियमांमध्ये बदल करणार आहे. आगामी देशांतर्गत हंगामात दुखापतीमुळे बदली क्रिकेटपटूला परवानगी दिली आहे. जर एखाद्या क्रिकेटपटूला गंभीर दुखापत झाली असेल आणि तो सामन्यात पुढे खेळण्याच्या स्थितीत नसेल, तर त्याच्या जागी दुसऱ्या क्रिकेटपटूला संधी मिळेल. हा नियम बहु-दिवसीय देशांतर्गत सामन्यांमध्ये लागू असेल. म्हणजेच एका दिवसापेक्षा जास्त काळ चालणाऱ्या सामन्यांमध्येच लागू होणार आहे.
इंग्लंडमधील अलिकडेच अँडरसन-तेंडुलकर मालिकेत ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सलाही दुखापत झाली होती. नियमांनुसार दुखापत डोक्याला असेल तरच क्रिकेटपटूची जागा घेता येते. याला कंकशन रिप्लेसमेंट म्हणतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हाच नियम लागू आहे. पण भारतात होणाऱ्या देशांतर्गत क्रिकेटसाठी बीसीसीआयने इतर दुखापतींमध्येही बदली क्रिकेटपटूला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या क्रिकेटपटूला सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली तर बदली क्रिकेटपटूला परवानगी देता येणार आहे. ही दुखापत खेळादरम्यान आणि मैदानाच्या आत व्हायला हवी तरच हा नियम लागू होणार आहे. याबाबत अनेक क्रिकेटपटूंचे वेगवेगळे मत आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने याला विनोद म्हटले, तर गौतम गंभीरने त्याचे स्वागत केले. भारताचा ऋषभ पंत आणि इंग्लंडचा ख्रिस वोक्स दोघांनाही चौथ्या आणि पाचव्या कसोटीत गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर ते सामन्यात सहभागी होऊ शकले नाहीत.बीसीसीआयने अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या पंचांच्या कार्यशाळेत नवीन खेळण्याच्या परिस्थितीची माहिती दिली. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, हा नियम सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे स्पर्धेत लागू होणार नाही. आयपीएलमध्ये तो लागू होईल की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण सीके नायडू ट्रॉफी आणि अंडर-१९ मल्टी-डे टूर्नामेंटमध्ये तो लागू होणार आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे
