पुणे, 24 जुलै (हिं.स.)।
दौंड तालुक्यात चौफुला इथं कला केंद्रात गोळीबाराची घटना घडली होती. न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये बाळासाहेब मांडेकर यांचाही समावेश आहेत. बाळासाहेब हे भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकरांचे भाऊ आहेत. बाळासाहेब मांडेकरसह दोघांना पहाटे पाच वाजता अटक केली. पण अद्याप त्यांची ओळख परेड झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
चौफुला इथल्या कलाकेंद्रात गोळीबार प्रकरणी बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे आणि एक अनोळखीसह चौघांवर गुन्हा दाखल झालाय. यापैकी चंद्रकांत मारणे अद्याप सापडला नसून त्याचा शोध घेतला जात आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांची कलाकेंद्रातील नृत्यांगणा आणि इतरांसमोर ओळख परेड घेतली जाणार आहे.
न्यू अंबिका आणि अंबिका कला केंद्रात गाणी, नृत्यू, लावणी कला सादर करण्यात येते. सोमवारी रात्री कलाकेंद्रात नेहमीप्रमाणे कार्यक्रम सुरू होते. पण त्याचवेळी आवडती लावणी सादर करण्यास लावण्यावरून दोन गटात राडा झाला. यातूनच गोळीबार करण्यात आला. या गोळीबार एक नृत्यांगणा जखमी झाल्याचीही चर्चा आहे.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
