सोलापूर, 11 जुलै (हिं.स.)।
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याप्रकरणी जिल्हा बँकेतील सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याच्या प्रकरणात बँकेची जवळपास २७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक पाहणीतून समोर आले आहे. शाखाधिकाऱ्यांनी बँकेची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. खोट्या सोन्याच्या प्रकरणात संबंधित सोनार आणि कर्जदार यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची तयारी बँकेने केली असल्याचे समजते.
जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हा बँकेच्या सर्वच शाखांची अचानकपणे तपासणी करण्याचे आदेश दिले होते. ज्यावेळी तपासणीसाठी सोलापुरातील सोनारांचे पथक या शाखांमध्ये गेले, त्यावेळी या गोष्टी त्यांच्या उघडकीस आल्या आहेत. जिल्हा बँकेचे प्रशासक भोळे यांनी बँकेच्या फसवणुकीचे प्रकरण गांभिर्याने घेतल्याचे समजते. या प्रकरणात पहिल्या टप्प्यात सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर संबंधित सोनार आणि कर्जदार यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याचे समजते.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड
