पुणे, 1 जुलै (हिं.स.)। विमान उतरताना धावपट्टीवर कुत्रा पाहून प्रसंगावधान राखीत वैमानिकाने संभाव्य अपघात टाळला. या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या विमानतळ प्रशासनाने पुणे महानगरपालिकेच्या श्वान पथकामार्फत विमानतळावरून पाच कुत्रे पकडले. विमानतळ टर्मिनल आणि धावपट्टीचा परिसर या भागात अजूनही अशा शंभरहून अधिक कुत्र्यांचा वावर असल्यामुळे अपघाताचा धोका कायम आहे.
विमानतळ टर्मिनल आणि धावपट्टी सहित लोहगाव हवाई दलाचा परिसर शेकडो एकर वर पसरलेला आहे. तेथे अंतर्गत असलेल्या भिंतींना काही ठिकाणी पाणी जाण्यासाठी छिद्र ठेवलेली आहेत तर काही ठिकाणी फक्त तारेचे कुंपण आहे.त्यामुळे तेथील मोकाट कुत्र्यांना धावपट्टीवर सहज येता येते. अशा कुत्र्यांना पकडण्यासाठी आणि त्यांची नसबंदी करण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे श्वान पथक महिन्यातून चार ते पाच वेळा तेथे जाऊन कुत्रे पकडतात.
—————
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु
