मुंबई, मार्च :- अरबी समुद्रात भारतीय हद्दीतील एका व्यापारी जहाजाला बंदी बनवलेल्या सोमालियाच्या ३५ समुद्री चाच्यांना भारतीय नौदलानं कोंडीत पकडलं होतं. तसेच त्यांना समर्पण करण्यासाठी भाग पाडलं होतं. या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज नौदलानं त्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली केलं.
आठवडाभरापूर्वी १६ मार्च रोजी नौदलाने हे अँटी पायरसी ऑपरेशन केले होते. नौदलाच्या ‘आयएनएस’ कोलकाताने या समुद्री चाच्यांना ताब्यात घेतले होते. या सर्व चाच्यांना मुंबईतील नौदलाच्या डॉकयार्डमध्ये आणण्यात आले आहे. याच ठिकाणी त्यांचा ताबा मुंबई पोलिसांकडे देण्यात आला.
नौदलाने आपल्या पी-८१ कोस्टगार्ड विमान, फ्रन्टलाईन जहाज, आयएनएस कोलकाता आणि आयएनएस सुभद्रा आणि मानवरहित विमान तैनात केले होते. या मोहिमेसाठी सी-१७ विमानातून खास मार्कोस कमांडोंना जहाजावर उतरवण्यात आले होते. भारतीय नौदलाने भारतीय समुद्र किनाऱ्यापासून १४०० नॉटिकल माईलवर असलेल्या एका व्यापारी जहाजावर कब्जा करणाऱ्या ३५ सोमालियन समुद्री चाच्यांना आत्मसमर्पणाशिवाय कुठलाही पर्याय ठेवला नव्हता. त्यानंतर नौदलाच्या जवानांनी या जहाजावरील १७ चालक दलाच्या सदस्यांची सुखरुप सुटका केली होती.
नौदलाने ही कारवाई ‘ऑपरेशन संकल्प’च्या माध्यमातून केली. या मोहिमेंतर्गत भारतीय नौदलाची जहाजे अरबी समुद्र आणि अदन खाडीत तैनात करण्यात आली आहेत. यामुळे येथून जाणाऱ्या युद्धनौका व मालवाहू नौकांची सुरक्षा केली जाऊ शकले. याच ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाने समुद्री डाकूंच्या समुहाला जेरबंद केले आहे.
नौदलाने सांगितले की, आयएनएस कोलकाता जेरबंद करण्यात आलेले ३५ समुद्री चाच्यांना घेऊन २३ मार्च रोजी मुंबईत परतले. भारतीय कायदा व समुद्री चोरी विरोधी अधिनियम २०२२ नुसार या प्रकरणात पुढील कारवाई केली जाईल. समुद्री चाच्यांना स्थानिक पोलिसांकडे सोपवले आहे. १५ मार्च रोजी ४० तासांहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशनमध्ये आयएनएस कोलकाताने यूकेएमटीओ (यूनाइटेड किंगडम मेरीटाइम) मधून भारतीय नौदलाच्या सूचना संलयन केंद्र-हिंद महासागर क्षेत्रातील इनपुटच्या आधारावर अरबी समुद्रात समुद्री चाच्यांचे जहाज रोखून धरले होते. या जहाजाचा वापर समुद्री लुटपाटसाठी हल्ले व व्यापाऱ्यांच्या अपहरणासाठी केला जात होता. त्यानंतर १५ मार्चच्या सकाळपासून आयएनएस कोलकाताने समुद्री चाच्यांच्या जहाजावर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती.
