नवी दिल्ली, फेब्रुवारी : एडटेक कंपनी बायजूचे (BYJU) संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) इमिग्रेशन ब्युरोला लुकआउट सर्कुलर जारी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे रवींद्रन यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रवींद्रन यांनी देश सोडून जाऊ नये, यासाठी लुकआउट सर्कुलर जारी करण्याचे निर्देश दिले आहेत.
ईडीने नोटीसमध्ये म्हटले आहे की, कंपनीने नमूद केले होते की, त्यांनी भारताबाहेर महत्त्वपूर्ण परदेशी निधी पाठवला आणि परदेशात गुंतवणूक केली, जी परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) तरतुदींचे उल्लंघन करते आणि त्यामुळे भारत सरकारच्या महसुलाचे नुकसान झाले आहे. याआधी एप्रिल २०२३ च्या छापेमारीनंतर ईडीने एका निवेदनात म्हटले होते की, बायजूच्या फेमा कायद्यातील तरतुदीनुसार असे दिसून आले की, कंपनीला २०११ ते २०२३ पर्यंत सुमारे २८ हजार कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक मिळाली. यामधून कंपनीने विविध देशांना ९,७५४ कोटी रुपये पाठवले आहेत. याच काळात त्यांनी थेट परकीय गुंतवणुकीच्या नावावर दावा केला होता. दरम्यान बायजूच्या काही गुंतवणूकदारांनी रवींद्रन यांना काढून टाकण्याची मागणी केली आहे. यासाठी रवींद्रन यांना उद्या, शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) अति महत्वाच्या असाधारण सर्वसाधारण सभेला (ईजीएम) सामोरे जावे लागणार आहे. रवींद्रन गेल्या तीन वर्षांपासून दिल्ली आणि दुबई दरम्यान प्रवास करत आहेत, असल्याचे तपासात समोर आले आहे
