आयोगाने शरद पवार गटाचा दावा फेटाळून लावला
मुंबई, 06 फेब्रुवारी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर निवडणूक आयोगाचा निकाल आज, मंगळवारी जाहीर झालाय. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला बहाल करण्यात आलेय. त्यामुळे शरद पवार गटाला आता वेगळा पक्ष आणि चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचे असल्याचे सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केले होते. शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या त्याच पद्धतीने घडामोडी या नंतरच्या राष्ट्रवादीमध्ये घडल्या. अजित पवारांनी भाजपला साथ दिल्यानंतर बहुतांश आमदार हे त्यांच्यासोबत गेले आणि राष्ट्रवादीचा वाद हा निवडणूक आयोगामध्ये पोहोचला. जो न्याय शिंदेच्या शिवसेनेला दिला तोच निर्णय अजित पवारांच्या गटाला देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र्य गट म्हणून मान्यता दिली आहे.
अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादी चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता शरद पवार गटाला त्यांच्या नव्या पक्षाचे नाव आणि चिन्हाची सूचना ही उद्या, बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत द्यावी लागणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाला यावर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे.
