डोंबिवली, ६ फेब्रुवारी : पश्चिम विभागातील एका इमारतीमधील सदनिकेची कर आकारणी करून देण्याकरिता लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कल्याण डोबिवली महानगरपालिका ह प्रभागक्षेत्र कार्यालयातील करविभाग शिपाई योगेश माधवराव महाले व ह प्रभागक्षेत्रातील सेवानिवृत्त कामगार सूर्यभान नानाजी कर्डक या दोघांना 50 हजार रुपयांची लाच घेतांना सापळा रचून रंगेहाथ पकडले.
आरोपी योगेश माधवराव महाले (वय ४० वर्ष) शिपाई, कर विभाग, ह वार्ड कल्याण डोंबिवली महानगरपालिका व सूर्यभान नानाजी कर्डक (वय ६० वर्ष) सेवानिवृत्त कामगार ह वार्ड कल्याण डोंबिवली महानगरपालिका असून यांनी मंगळवारी डोंबिवली पश्चिमेतील एका इमारतीमधील सदनिकाना कर आकारणी करून देण्याकरिता प्रत्येक सदनिकामागे ३०००/- रुपये प्रमाणे ३६ फ्लॅट साठी. १,०८,०००/- रुपये रकमेची मागणी करून सदर रकमेपैकी ५०,०००/- रुपये लाच स्वीकारली असता आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई सुनिल लोखंडे (पोलिस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र), महेश तरडे (अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र), सुधाकर सुरडकर (अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी, ठाणे परिक्षेत्र), तपासी अधिकारी विलास मते (पोलीस निरीक्षक, एसीबी, ठाणे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास मते, ला.प्र.वि., ठाणे .स.फौ. भावसार, पो. हवा. सचिन मोरे, पो.हवा. रामचंद्र लोटेकर, पो.हवा. मच्छिंद्र पोटे, स.पो.उप.निरी चौधरी (चालक) यांनी कारवाई केली.
