ऍक्रोबेटिक जिम्नॅस्टीक राज्य अजिंक्यपद स्पर्धा
अमरावती, 6 फेब्रुवारी : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे २९ व्या अॅक्रोबेटिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटना, अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटना व मंडळाद्वारे संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी राज्यभरातील जिम्नॅस्टिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी पंकज आकोडे यांची मुलगी पोर्णिमा पंकज आकोडे हिने डाइनामीक, बॅलेन्स व कंम्बाइन या तीन अॅक्रोबेटिक जिम्नॅस्टीक प्रकारात तीन रजत पदक पटकाविले आहे. सोबतच केरळ येथे १६,१७ व १८ फेब्रुवारी रोजी होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड सुद्धा झाली आहे. तिच्या या यशाचे श्रेय श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटना, अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटना व मंडळाद्वारे संचालित डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन तसेच तिचे आई, वडील यांना दिले आहे. या खेळात अमरावती जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
क्रीडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे द्वारे शिव छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे २६ ते २९ नोव्हेंबर, २०२३ दरम्यान आयोजीत शालेय राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक स्पर्धेमध्ये पोर्णिमा पंकज आकोडे ही सहभागी झाली होती. या शालेय राज्यस्तरीय जिम्नॅस्टीक स्पर्धेत कु.पोर्णिमा आकोडे हिने अॅक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टीक मधील मुलीच्या १९ वर्ष वयोगटातील वुमेन्स ग्रुप मध्ये कास्य पदक पटकाविले होते.
