नाशिक, २९ जानेवारी (हिं.स.) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एक फेब्रुवारीपासून चार दिवस नाशिक मध्ये येत असून यादरम्यानचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका घेऊन चाचपणी करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एक फेब्रुवारीपासून नाशिक दौऱ्यावर येत आहेत. चार दिवस ते नाशिकमध्ये तळ ठोकणार आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीची तयारी व उमेदवारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राज ठाकरे यांनी यंदा मनसे लोकसभा निवडणूक लढवेल, अशी घोषणा केली आहे. स्थानिक नेत्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते ४ दिवस नाशिकमध्ये तळ ठोकणार असल्याने मनसेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवर अगदी बूथनिहाय नियोजन केल्याचा दावा करण्यात येतो. तुम्ही तयारीला लागा, मी सांगतो, असा निरोपच राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिला होता.आता ते शहरात राहणार असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यात राज्याचे उपाध्यक्षपद सलीम शेख यांना देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये आनंदाने उत्साहाचे वातावरण आहे.
