* बुटीबोरी ते फेटरी या आऊटर रिंग रोडचे लोकार्पण
नागपूर, 5 फेब्रुवारी : – नागपूर शहराच्या वर्धा रोडवर स्थित एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ते रिंग रोड जंक्शन, तसेच रिंग रोडपासून ते बुटीबोरीच्या उड्डाणपूलापर्यंतचा रस्ता सहा पदरी होणार आहे. अमरावती रस्त्यावरील वाडीपासून ते कोंढाळीपर्यंतचा रस्ता सुद्धा सहा पदरी होणार आहे .मेट्रो स्टेशन प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जामठा मेट्रो स्टेशनपासून खाली रस्ता-वरती फ्लायओवर आणि त्यावरती मेट्रो अशी डबल डेकर रचना राहणार आहे. त्यामुळे बुटीबोरीपर्यंतचे अंतर कमी होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
नागपूर शहरासाठीच्या नागपूर सिटी पॅकेज-१ अंतर्गत बुटोबोरी ते फेटरी चार पदरी रिंगरोड-बायपासचं लोकार्पण रविवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आरआरआर लॉन, हिंगणा रोड, आऊटर रिंगरोड येथे झाले. त्यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने , हिंगण्याचे आमदार समीर मेघे प्रामुख्याने उपस्थित होते.
हिंगणा आणि बुटीबोरी या दोन औद्योगिक वसाहतींना जोडणारा दुवा म्हणून हा नवा आउटर रिंग रोड योजनाबद्ध विकासासाठी सज्ज होईल या रोडच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क राहणार आहेत .या आऊटर रिंग रोडने अमरावती रोड वर आल्यावर खालच्या अंडरपास वरून फेटरीपर्यंतचा रिंग रोड पूर्ण झाला असून हाच रिंग रोड पुढे कामठी आणि रिंग रोडला जोडण्यासाठीचे काम पुढच्या दोन महिन्यात पूर्ण होईल असे गडकरींनी यावेळी सांगितले.जामठ्याच्या जवळ 8 हेक्टरवर देशातील पहिला ‘बर्ड पार्क ‘ विकसित केला जाणार असून यामध्ये विविध फळांच्या जाती लावल्या जाणार आहेत त्यामुळे येथे पक्षी आपल्या नैसर्गिक सहवासात राहू शकतील याचप्रमाणे येथे सायकल ट्रॅक आणि कॉफी शॉप सुद्धा राहणार आहे , अशी माहिती गडकरी यांनी दिली. हिंगणा शहराच्या योजनाबद्ध विकासासाठी येथील अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करण्याची सूचना देखील त्यांनी यावेळी केली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं की आऊटर रिंग रोडच्या निर्मितीत अडचणी आल्या परंतु गेल्या दोन वर्षात या रिंग रोडचे काम प्रचंड वेगाने झाले आहे . समृद्धी महामार्गावरून आल्यानंतर या आऊटर रिंग रोडच्या माध्यमातून जडवाहतूक आणि वाहतुकीला कोंडीला सामोरे जावे लागणार नाही .या रिंग रोडवर ‘रिम ट्रान्सपोर्ट ‘च्या द्वारे शहराच्या आणि जिल्ह्याच्या कोणत्याही भागात जाता येईल अशी सुविधा निर्माण झाली आहे असे देखील फडणवीस यांनी स्पष्ट केलं . रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी बुटीबोरी पासून ते फेटरीपर्यंत आउटर रिंग रोड तयार झाल्याने दीड तासाचे अंतर केवळ 45 मिनिटात कापणे शक्य झाल्याचे सांगितले .या आऊटर रिंग रोडवरील रहदारी आणि वाहतूक वाढल्यामुळे हा रोड चार पदराऐवजी सहा पदरी करावा अशी सूचना त्यांनी केली .
केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानं हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. या आऊटर रिंग रोड ची लांबी 33.50 किलोमीटर असून 856 कोटीच्या तरतुदीने हा रस्ता पूर्ण करण्यात आला आहे .या प्रकल्पामुळे सुरक्षित प्रवास आणि मालवाहतूक होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे . त्याचप्रमाणे वाहतुकीची कोंडी सुद्धा मोकळी होणार आहे . या आऊटर रिंग रोड मध्ये सव्वा दोन किलोमीटरचे 3 उड्डाणपूल , दोन प्रमुख पुल त्याचप्रमाणे 22 बस -वे शेल्टर सेंटर यांचा समावेश आहे . या पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने बांबूचे पर्यावरण पूरक असे क्रॅश बॅरियर्स लावण्यात आले आहे .या रस्त्यावरून 100 किलोमीटर प्रतितास वाहन मर्यादा आहे , अशी माहिती या पुलाच्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दाखवलेल्या चित्रफितीत देण्यात आली .
या कार्यक्रमाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ,स्थानिक लोकप्रतिनिधी, हिंगणा शहरातील नागरिक उपस्थित होते .
