– राजदशी काडीमोड, भाजपाशी हातमिळवणी
– दोन उपमुख्यमंत्री, एकूण नऊ जणांनी घेतली शपथ
पाटणा, 28 जानेवारी : – बिहारमध्ये जदयु-राजद यांच्यात झालेल्या वादानंतर अखेर भाजपा पुन्हा सत्तेत आली आहे. राजदशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपाशी हातमिळवणी करत नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यासोबतच भाजपाचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात राज्यपालांनी एकूण नऊ जणांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे यावेळी भारत माता की जय आणि जय श्री राम या घोषणांनी राजभवन परिसर दुमदुमला. सोहळ्याला जीतन राम मांझी, चिराग पासवान, जेपी नड्डा, विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते.
गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू होती. आज या राजकीय घडामोडींना पूर्णविराम लागला आहे. रविवारी सकाळी नितीश कुमार यांनी त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिला होता आणि राजद सोबतच्या सरकारमधून त्यांचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे बिहारमधील सरकार आपोआपच बरखास्त झाले. दरम्यान भाजपाच्या पाठिंब्यासोबत नितीश कुमार यांनी नवं सरकार बिहारमध्ये स्थापन केलं आहे.
शपथ ग्रहण सोहळ्यात नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची, भाजपा नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सोबतच जनता दल (युनायटेड) नेते विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, प्रेम कुमार (भाजपा), श्रवण कुमार (जदयू), सुमित कुमार (अपक्ष) आणि संतोष सुमन (हम)
१० वर्षांत पाच वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ
नितीश कुमारांनी आज (२८ जानेवारी) नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या १० वर्षांत त्यांनी पाच वेळा वेगवेगळ्या आघाडी आणि युतीसह सत्ता स्थापन केली होती. तर २०२२ मध्ये त्यांनी एनडीएची साथ सोडून राजद-काँग्रेसच्या महाआघाडी सरकारमध्येही ते मुख्यमंत्री बनले होते. तर, आता दोनच वर्षांत त्यांनी महाआघाडीची साथ सोडून पुन्हा एनडीएला जवळ केले आहे. म्हणजे दोन वर्षांत त्यांनी दोनदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
