* बीसीसीआयला मिळणार २,५०० कोटी रुपये
मुंबई, २० जानेवारी (हिं.स.) : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२४ सुरू होण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधी टाटा समूहाने पुन्हा एकदा लीगचे शीर्षक प्रायोजकत्व (टायटल स्पॉन्सरशीप) हक्क मिळवले आहेत. आता टाटा समूहाकडे पुढील पाच वर्षे म्हणजे २०२८ पर्यंत टायटल स्पॉन्सरशिप राहणार आहे. या कालावधीत टाटा समूह बीसीसीआयला दरवर्षी ५०० कोटी रुपये देणार आहे. म्हणजे टाटा समुहाकडून पाच वर्षांत बीसीसीआयला २,५०० कोटी रुपये मिळणार आहेत.
बीसीसीआयने आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशिपसाठी टेंडर जारी केले होते. यासाठी आदित्य बिर्ला समुहाने बोली लावली होती पण टाटा सन्सने ही बोली जिंकली. टाटा समूहाने २०२२ मध्ये हे हक्क विवोकडून (Vivo) बोलीद्वारे जिंकले होते. दरम्यान, ड्रीम 11 ला एका हंगामासाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे हक्कही मिळाले आहेत. यापूर्वी २००८ मध्ये याला पेप्सी आयपीएल असेही म्हटले जात होते. पण आता पुढची पाच वर्षे लोक याला टाटा आयपीएल म्हणताना दिसणार आहेत.
यापूर्वी २०१८ मध्ये विवोने पाच वर्षांसाठी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळवले होते. यामध्ये २,१९९ कोटी रुपयांचा करार झाला होता. पण एका वर्षातच हा करार कोरोनामुळे थांबला. कोविडच्या काळात ड्रीम 11ने आयपीएलच्या एका हंगामासाठी टायटल स्पॉन्सरशीप मिळवली होती. त्यानंतर २०२२ मध्ये जेव्हा भारत आणि चीनमधील वाद वाढला, तेव्हा टाटा समूहाने यात उडी घेतली आणि विवोला ३६५ कोटी रुपये प्रति हंगाम रक्कम देण्याचा निर्णय घेतला. यानंतर टाटांना आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरचे अधिकार मिळाले. टाटा समूह २०२२ पासून आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. २०२२ आणि २०२३ हंगामासाठी टाटांनी बीसीसीआयला ३६५ कोटी प्रति हंगाम दराने ७३९ कोटी दिले होते.
बीसीसीआय आयपीएल २०२४ मध्ये ७४ सामने आयोजित करणार आहे. तर २०२५ पासून हेच सामने ८४ होणार आहेत. तसेच २०२७ मध्ये यात आणखी वाढ होऊन ९४ होऊ शकतात.
हिंदुस्थान समाचार
