अयोध्या, 16 जानेवारी (हिं.स.) : अयोध्येत 22 जानेवारीला भव्य राम मंदिरात रामलल्लाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर 108 फूट लांब अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे.
अयोध्येसह भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन होऊन राम नामाचा जप करत आहेत. रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमाला सुरुवात झाली असून हा कार्यक्रम 22 जानेवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये अनेक विधी, यज्ञ केले जाणार आहेत. श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त आणि अनेक प्रकारच्या भेटवस्तू अयोध्येत पोहोचत आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी भव्य अगरबत्तीची खूप चर्चा रंगली आहे.
राम मंदिरासाठी खास अगरबत्ती तयार करण्यात आली असून ही अगरबत्ती सुमारे दीड महिने प्रज्वलित राहील, असे सांगण्यात येत आहे. ही खास अगरबत्ती गुजरातच्या वडोदरामध्ये तयार करण्यात आली आहे. या अगरबत्तीची लांबी 108 फूट आणि वजन 3500 किलो आहे. आज राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होताच ही भव्य अगरबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे. याचा व्हिडीओही समोर आला आहे.
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्येत पोहोचलेली ही 108 मीटर लांब अगरबत्ती आज पेटवण्यात आली. ही 108 मीटर लांब अगरबत्ती गुजरातच्या वडोदरा येथून अयोध्येमध्ये पोहोचली आहे. ही अगरबत्ती बनवण्यासाठी सहा महिने लागले. ही अगरबत्ती अयोध्येला पोहोचल्यानंतर श्री रामभूमी तीर्थ क्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास जी महाराज यांच्या उपस्थितीत ‘जय श्री राम’च्या जयघोषात ती प्रज्वलित करण्यात आली. या अगरबत्तीची रुंदी 3.5 फूट आहे. 1470 किलो शेण, 420 किलो जडीबुटी, 376 किलो गुग्गुलू, 376 किलो नारळाच्या शेंड्या आणि 190 किलो तूप मिसळून ही अगरबत्ती तयार करण्यात आली आहे. त्याचा सुगंध अनेक किलोमीटरपर्यंत पसरल्याचे दिसून आले.
हिंदुस्थान समाचार
