पुणे, 14 जानेवारी (हिं.स.) कॅम्प भागात एका टोळक्याने सराईत गुंडावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. पसार झालेल्या टोळक्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरबाज ऊर्फ बबन शेख (वय ३५, रा. चुडामन तालीम, भवानी पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे.
कॅम्प परिसरातील ताबूत स्ट्रीट परिसरात खाऊगल्ली आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास तेथे मारामारी सुरू असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा एकावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले होते; तसेच त्याच्या डोक्यात दगड मारण्यात आला होता. शेखला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
हिंदुस्थान समाचार
