रत्नागिरी, 10 जानेवारी, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारासाठी येत्या २२ जानेवारीपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुरस्काराकरिता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांना अर्ज करता येईल. इच्छुकांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https:ports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंक
(Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर २२ जानेवारी रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फक्त ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात आले आहे.
क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिंकरिता जीवनगौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. शासनाने २९ डिसेंबर २०२३ च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली विहित केली असून त्यानुसार २०२२-२३ या वर्षाच्या पुरस्कारासाठी २२ जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
हिंदुस्थान समाचार
