सोलापूर, 9 जानेवारी, ( हिं.स) पंधरा हजारांपेक्षा जास्त कुस्ती शौकिनांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झालेल्या लढतीत या वर्षीचा ‘भीमा केसरी’ होण्याचा मान पैलवान सिकंदर शेख याने पटकावला.पंजाब केसरी प्रदीपसिंग जिरगपूरला चितपट करत सिकंदर शेखने डबल भीमा केसरी किताब घेण्याची किमया केली आहे.राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा देत सिकंदर शेख याचा सन्मान करण्यात आला.
दरम्यान, कुस्ती क्षेत्रासाठीच योगदान विचारात घेऊन खासदार महाडिक यांचा सन्मान करत सिकंदरने श्री महाडिक यांना खांद्यावर घेत मैदानाची फेरी मारली.या स्पर्धेचे आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी कारखाना कार्यस्थळावर केले होते. भीमा केसरीच्या किताबासाठी झालेल्या लढतीत दोन्ही ही पैलवान हे तुल्यबळ होते.पंजाब केसरी विजेता प्रदीपसिंग जिरगपूर विरुद्ध महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अशी कडवी झुंज झाली. १५ व्या मिनिटाला वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे प्रदीपसिंगचा निभाव लागला नाही.
हिंदुस्थान समाचार
