नाशिक, ०८ जानेवारी (हिं.स.) : महिलेकडून सव्वाचार लाखांची खंडणी मागून आणखी पैसे न दिल्यास व्हिडिओ वडिलांना पाठवून आत्महत्या करण्याची धमकी देणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी संतोष राजेंद्र आरोटे (वय २८) व भाऊ शुभम् आरोटे (वय २५, दोघेही रा. तामसवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) यांनी संगनमत करून पीडित फिर्यादी महिलेला व्हॉट्सऍप व टेक्स्ट मेसेजद्वारे, तसेच फोन करून पैशांची मागणी केली, तसेच हे पैसे न दिल्यास तुझे व्हिडिओ तुझ्या वडिलांना पाठवीन, तसेच आत्महत्त्या करीन, अशी धमकी देऊन फिर्यादीकडून आतापर्यंत ४ लाख २८ हजार ६०० रुपयांची रक्कम स्वीकारली, तसेच फिर्यादीला मानसिक त्रास दिला.
हा प्रकार १९ सप्टेंबर २०१९ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत गोविंदनगर येथे घडला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून फिर्यादीने मुंबई नाका पोलीस ठाण्यात संतोष आरोटे व भाऊ आरोटे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेळके करीत आहेत.
हिंदुस्थान समाचार
