आरोपींच्या घरातून सीबीआयने जप्त केले 2.15 कोटी
नागपूर, 04 जानेवारी (हिं.स.) : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुरुवारी नागपुरात सापळा रचून पेट्रोलियम एण्ड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनच्या (पेसो) 2 लाचखोर अधिकाऱ्यांना 10 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली. अशोक कुमार दलेला आणि विवेक कुमार अशी आरोपींची नावे असून हे दोघेही पेसोमध्ये स्फोटक नियंत्रक पदावर कार्यरत आहेत.
याप्रकरणी सीबीआयने अशोक कुमार दलेला आणि विवेक कुमार यांच्यासह प्रियदर्शन दिनकर देशपांडे (रा. लक्ष्मीनगर नागपूर) आणि मेसर्स सुपर शिवशक्ती केमीकलचे संचालक देवी सिंग कछवाह (श्रीपुरा, राजस्थान ) या अन्य 2 आरोपींना देखील अटक केलीय. सीबीआयने देशपांडे याच्या घरून 1 कोटी 25 लाख आणि विवेक कुमारच्या घरून 90 लाख रुपयांची रोकड जप्त केलीय. या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार मेसर्स सुपर शिवशक्ती केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड (श्रीपुरा, तहसील-रावतभाटा, जिल्हा चित्तोडगड) ही एक खाजगी लिमिटेड कंपनी आहे. या फर्मला मार्च 2024 पर्यंत 75 टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर उत्पादन क्षमता वापरायची होती. त्यासाठी मागितलेल्या परवान्याची परवानगी पेसो कार्यालयात प्रलंबित होती. ही परवानगी मिळवून देण्यासाठी प्रियदर्शन दिनकर देशपांडे यांच्या मार्फत लाच देऊन काम करण्याचे ठरले. प्रियदर्शन देशपांडे, एक खाजगी व्यक्ती आणि पेसो, नागपूर कार्यालयातील अज्ञात सरकारी सेवकांसोबत संगनमत करून 10 लाखांची लाच देण्याचे ठरले. मेसर्स सुपर शिवशक्ती केमीकल मधील परवान्यांच्या मुदतवाढीचे काम देखील पेसोच्या अज्ञात अधिकाऱ्यांनी प्रियदर्शन दिनकर देशपांडे मार्फत मोठ्या लाचेच्या बदल्यात केले होते, असे देखील तपासात उघड झाले आहे.
ठरल्या नुसार देवीसिंह कछवाहा हे प्रियदर्शन दिनकर देशपांडे यांना भेटण्यासाठी नागपुरात पोहोचले. त्यानंतर दोघांनी उपरोक्त काम मार्गी लावण्यासाठी पेसोच्या अज्ञात अधिकाऱ्यांची भेट घेतली. देवीसिंह कछवाहा हे 50 हजार रुपयांची लाच देणार होते. तर 10 लाखांची व्यवस्था ते नागपुरातच करणार होते. प्रियदर्शन दिनकर देशपांडे हे पेसोच्या अज्ञात अधिकाऱ्यांकडून भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गाने काम करून घेण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करीत होते.
हिंदुस्थान समाचार
