नाशिक, ४ जानेवारी, (हिं.स) – उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये पोलिसांनी राबविलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत 15 कोटी पेक्षा अधिक रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा हा पकडण्यात आला असून शेकडो आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.
सध्या सर्वत्र तरुण पिढी ही अंमली पदार्थाच्या आहारी जाण्याचे प्रमाणात वाढ होऊन स्वतःचे तसेच कुटूंबाचे जीवन उध्दवस्त करीत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. या घटनांना कारणीभूत असलेला अंमली पदार्थास प्रतिबंध व्हावा या हेतुन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी. जी. शेखर पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली अहमदनगर, जळगांव, नाशिक ग्रामिण, धुळे व नंदुबार जिल्हयात सन २०२३ या संपुर्ण वर्षांत अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
या विशेष मोहीमे दरम्यान नाशिक परिक्षेत्रात एन डी पी एस कायदयांतर्गत एकुण ३३९ गुन्हे दाखल करुन त्यात ४५८ आरोपी निष्पन्न करण्यात आले होते. सदर आरोपींकडुन गांजा- ८ कोटी १७ लाख ०२ हजार,०२६ रुपये, तर इतर अमली पदार्थांमध्ये अफु-१६ लाख ९८ हजार ,०९८ रुपये, टॅबलेट-१लाख,४५ हजार ४२५ रुपये, एमडी पावडर- २ लाख ४६ हजार ,१६५, इतर गुंगीकारक औषधे-२ लाख ०४ हजार ९२४ रुपये असा एकुण ८ कोटी ३९ लाख,९६, हजार ६३८ रुपयाचा अंमली पदार्थाचा माल जप्त करुन ठोस कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती देऊन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शेखर पाटील यांनी सांगितले की, शाळा-कॉलेजेस परिसरात पोलीस पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे.
वेळोवेळी अंमली पदार्था संदर्भातील अवैध धंदयांवर छापे टाकण्यात येत आहेत. विदयार्थी-पालकांशी संवाद घडवुन आणणारे जनजागृतीचे कार्यक्रम अहमदनगर, जळगांव, नाशिक ग्रामिण, धुळे व नंदुबार या नाशिक परिक्षेत्रीय जिल्हयांमध्ये ठिकठिकाणी विशेषतः कॉलेजमध्ये घेण्यात आले. धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगांव, नाशिक ग्रामीण, मालेगांव येथील कार्यक्रमांमध्ये डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करुन जनजागृती केली आहे. अंमली पदार्थ विरोधी मोहिम यशस्वी होण्यासाठी कंपन्या, गोडावुन तपासणे, बंद गोडावुन तपासुन देखील वेळोवेळी कारवाया करण्याच्या सक्त सूचना निर्गमीत करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाअंतर्गत नंदुरबार जिल्हा नशामुक्त घोषित करण्यात आला आहे.
नाशिक परिक्षेत्रीय स्तरावरील अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम यशस्वीपणे राबविणेकरीता विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील, नाशिक यांनी नागरीकांना आवाहन केले आहे की, अंमली पदार्थ विक्री, बाळगणे अथवा ताब्यात ठेवणे या संदर्भातील कोणतीही गोपनीय माहिती नागरीकांना मिळाल्यास अगर असे गैरप्रकार आढळुन आल्यास नागरीकांनी डायल ११२ अगर पोलीस सहकार्य दुरध्वनी क्र.१०० यावर अथवा गोपनीय पत्राव्दारे तात्काळ पोलीसांना माहिती दयावी.
हिंदुस्थान समाचार
