पुणे, 24 डिसेंबर (हिं.स.) : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांना खोकल्याचा त्रास होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली असता ही चाचणी पॉझिटिव्ह आली. तेव्हापासून मुंडे हे पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात असून तिथेच ते औषधोपचार घेत आहेत.
पुण्यातील मॉडर्न कॉलनी परिसरात मंत्री धनंजय मुंडे यांचे घर आहे. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून या घरी ते राहात असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र कोरोना चाचणी निगेटिव्ह येईपर्यंत ते पुण्यातील घरीच विलगीकरणात राहतील, अशी माहिती आहे. महाराष्ट्रात कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना सार्वजनिक आरोग्य विभागाने आधीचा टास्क फोर्स रद्द करून नवीन टास्क फोर्सची स्थापना केली आहे. आरोग्य क्षेत्रात संशोधन करणाऱ्या भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी असतील असे समजते.
हिंदुस्थान समाचार
