
श्वान पथक आणि ड्रोनच्या मदतीने शोध मोहिम
दहशतवाद्यांनी वापरल्या होत्या स्टील बुलेटस
पुंछ,23 डिसेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी सुरक्षा दलांनी 20 संशयीतांना ताब्यात घेतलेय. यांच्यावर दहशतवाद्यांची मदत केल्याचा आरोप असून सैन्याकडून या लोकांची चौकशी सुरू आहे.
पाकिस्तानची जिहादी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाशी संबंधित एँटी फॅसीस फ्रंट नामक दहशतवादी टोळी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यातील डेरा की गली भागात दबा धरून बसली होती (अँबुश) यापरिसरात सैन्याची तुकडी शोध मोमिहम राबवत असताना सुरनकोट भागातील डेरा की गली व बुफलियाज यादरम्यान वळणावर जिहादी दहशतवाद्यांनी सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला. त्यानंतर या परिसरात चकमक सुरू झाली. या हल्ल्यानंतर ‘डेरा की गली’ घनदाट जंगलात गुरुवारी रात्रीपासून सैन्याचे जवान शोध मोहीम राबवत आहे. भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने या भागात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संयुक्त मोहीम सुरू केली आहे.
घनदाट जंगलात शोध घेण्याबरोबरच हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या माध्यमातून आकाशातून पाळत ठेवली जात आहे. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही स्थानिक लोकांनी दहशतवाद्यांची मदत केली असा संशय पोलीस आणि तपास यंत्रणेला आहे. सुरक्षा दलांनी 20 स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. दरम्यान सैन्याच्या 16 व्या कोरच्या जनरल ऑफिसर कमांडिंग (जीओसी) लेफ्टनंट जनरल संदीप जैन यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान जिहादी दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी या परिसरात श्वान पथक तैनात करण्यात आले आहे.
जिहादी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ल्यानंतर गोळीबार करताना स्टीलच्या गोळ्यांचा वापर केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे, त्यामुळे वाहनांना छिद्रे पडले आहेत. दरम्यान, हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या शोधासाठी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात श्वान पथकाद्वारे शोध सुरू आहे. यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांना पाचारण करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर डेरा गली परिसरातील रस्ता बंद करण्यात आला आहे. परिसरातील चामरेड, मस्तान पास, दराबा, बाफलियाज, सावनी गली, डेरा की गली आदी संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. घनदाट जंगलासोबतच येथे अनेक नैसर्गिक गुहा आहेत. त्यांचा वापर केला जात असेल तर त्याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुत्रांनी सांगितले की, या परिसरात अनेक कच्ची घरे आहेत, ज्यांचा वापर उन्हाळ्यात गुजर बकरवाल करतात. हिवाळा सुरू होताच ते मैदानी प्रदेशात जातात. यामुळे हे सर्व ढोके रिकामे पडले आहेत. याचा वापर दहशतवादी लपण्यासाठी करत असण्याची शक्यता आहे.
हिंदुस्थान समाचार
