नाशिक, १३ डिसेंबर (हिं.स.) : नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पेठ रोड परिसरात अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाई दहा लाखापेक्षा अधिक किमतीचा गुटखा साठा केल्याचे समोर आले आहे ही कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे तर सातपूर येथे केलेल्या कारवाई हजार रुपयांचा गुटखा सापडला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सातपूर येथील एमएचबी कॉलनीत पवन संजय कोतकर, येथे धाड टाकली असता या ठिकाणी विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा 11 हजार 272 रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले. हा साठा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी पी.एस.पाटील यांनी ताब्यात घेतला. त्यामुळे या प्रकरणातील पवन संजय कोतकर, यांचेविरुध्द सातपुर पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सातपुर पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.
तर बुधवारी पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बाळकृष्ण निवास, 4614, बाळकृष्ण सदन, उन्नती हायस्कुलसमोर, पेठरोड, या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाला प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा विक्रीसाठी साठवणुक केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याअनुषंगे अन्न व औषध प्रशासन, कार्यालयाच्या पथक घटनास्थळी गेले असता या ठिकाण हे कुलूपबंद आढळून आले. आजुबाजूला चौकशी केली असता, जागामालक शिवाजी मधुकर पवार हे उपस्थित झाले, त्यांचा जबाब नोंदविला असता हे गोदाम दिनेश चंद्रकांत अमृतकर यांना भाड्याने दिल्याचे सांगितले. परंतू त्यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद आढळला व आजूबाजूस चौकशी केली असता कोणीही उपलब्ध न झाल्याने गोदामाचा खिडकीतून डोकावून पाहिले असता, प्रतिबंधित अन्नपदार्थाची पोती साठविल्याचे आढळून आल्याने पंचवटी पोलिस स्टेशन यांच्या बंदोबस्त मागितला असता पोलिसांच्या उपस्थितीत व पंचाच्या समक्ष हे गोदाम अन्न व औषध प्रशासनाच्या अधिका-यांनी कुलूप तोडून उघडून प्रवेश केला असता त्यामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. त्याचे मोजमाप केले असता आतापर्यन्त अंदाजे 10 लाखाच्या वर प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. त्यासंदर्भात अधिका-यांनी ताब्यात घेतला असून मोजमाप अदयाप सुरु असून अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पंचवटी पोलिस ठाण्यामध्ये संबंधित व्यक्तींविरुध्द भा.द.वि कलम 188, 272, 273, 328 अंतर्गत एफआयआर देण्यात येत आहे. पुढील कार्यवाही सुरु असून यापुढे अन्न व औषध प्रशासनाची जिल्हयात गुटख्याविरुध्द कार्यवाही सुरु राहणार आहे.
हिंदुस्थान समाचार
