सोलापूर , 10 डिसेंबर (हिं.स.) शहरासह हद्दवाढ भागातील महापालिकेच्या प्रसूतिगृह दवाखान्यांसह नागरी आरोग्य केंद्रामध्ये दहा ठिकाणी अमृत स्टोअरच्या धर्तीवर जेनेरिक औषधी केंद्रे उभारली जाणार आहेत. या कामाची निविदा अंतिम टप्प्यात असून नवीन वर्षात या कामाला मुहूर्त लागणार आहे. त्यामुळे शहरात इतर मेडिकलमधून नागरिकांची होणारी आर्थिक लूट या केंद्रामुळे थांबणार आहे.
केंद्र शासनाच्यावतीने अमृत स्टोअरच्या धर्तीवर शहर व हद्दवाढ भागात असलेल्या प्रसूतिगृह आणि नागरी आरोग्य केंद्र या ठिकाणी जेनेरिक औषध केंद्र उभारण्यात येणार आहे. सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांना कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देणे. गोळ्या-औषधांवरील खर्चावर नियंत्रण आणून आर्थिक दिलासा देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. शासन आदेशानुसार महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व रुग्णालय परिसरात महापालिका प्रशासनाच्यावतीने जेनेरिक औषध केंद्र उभारले जाणार आहे.
हिंदुस्थान समाचार
