सोलापूर 8 डिसेंबर ( हिं.स) राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्या, सोलापूर मध्य च्या लोकप्रिय आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या वाढदिवस निमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या मित्र परिवाराच्या वतीने आयोजित भव्य लेदर टी ट्वेण्टी ताई चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेत आज सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात हॉटेल ओरिएंट इलाईट संघाने सलग दुसरा विजय प्राप्त करताना वकिलांच्या ब संघाला 147 धावांनी पराभूत केले. तर दुपारच्या सत्रात साऊथ सोलापूर आपटे ग्रुपने ओल्ड यंग ग्रुप चा 126 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सुरूवात केली.
पहिल्या सामन्यात वेदांत काळे तर दुसऱ्या सामन्यात आदर्श मणुरे हे सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्या नंतर प्रथम फलंदाजी करताना हॉटेल ओरिएंट ने निर्धारित 20 षटकात 249 धावांचा डोंगर रचला.मोहनिष येमूलच्या 27 चेंडूतील ताबडतोब नाबाद 73 धावा (7 चौकार, 6 षटकार) सोबत निखिल थोबडेच्या 43,आदित्य तिकटे 48,भगवंत आदलींगे 30 यांनी धावा केल्या.
वकील संघाकडून मयूर खरात 48/3 बळी, तारासिंग राठोड 2 बळी घेतले.250 धावांचे अवघड लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेला वकील संघ 14 षटकात 9 बाद 102 धावाच करू शकला. त्यांच्याकडून तारासिंग राठोड ने एकतर्फी किल्ला लढवत 48 धावा केल्या तर गोलंदाजी मध्ये सामनावीर वेदांत काळे 32/4, नितीन गायकवाड 11/3,आदित्य तिकटे 1 बळी घेतले.दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या ओल्ड यंग ग्रुप संघाची गोलंदाजी फोडून काढत साऊथ सोलापूर आपटे ग्रुपने निर्धारित 20 षटकात 4बाद 243 धावा केल्या.त्यांच्या आदर्श मनुरे (98-52-13-3)चे शतक 2 धावांनी हुकले तर मंदार काळे (66-22-3-7) व आमिर शेख (53) यांनी धुवांधार फलंदाजी करत अर्धशतके झळकावली.ओल्ड यंग संघाकडून विनोद पाटील 2, प्रशांत काशीद – श्रेयस जहागीरदार एकेक बळी घेतले.
243 धावांचा पाठलाग करताना ओल्ड यंग संघाने अडखळत संथ सुरूवात केली. त्यांचे 7 गडी केवळ 55 धावावर बाद झाले. त्यानंतर आलेल्या आकाश लखोटिया 24, निलेश गायकवाड 21, शिरीष लोखंडे 19 धावा केल्या.
हिंदुस्थान समाचार
