कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेची कारवाई
पुणे, 05 डिसेंबर (हिं.स.) : देशातील मुलींची पहिली शाळा सुरू झाली ते पुणे येथील ऐतिहासिक भिडे वाडा सोमवारी रात्री जमीनदोस्त करण्यात आला. गेल्या महिन्यात वाड्यात राहणाऱ्या भाडेकरूंची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर कोर्टाने मनपाला वाडा ताब्यात घेण्याची सूचना केली होती. याठिकाणी आता लवकरच राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे
पुण्यातील बुधवार पेठ परिसरातील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये देशातील पहिली मुलींची शाळा केली होती. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे काम 2006 पासून रखडले आहे. भिडे वाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती. या बँकेच्या 24 भाडेकरूंनी या प्रकरणी महापालिकेविरोधात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयात 80 वेळा सुनावणी होऊन पुणे महापालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला.
या निकाला विरोधात भाडेकरूनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या वाड्याबाबत पालिकेने सर्वोच्च न्यायालयात अगोदरच कॅव्हेट दाखल केली आहे. या संदर्भात गुरुवारी सुनावणी झाली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाडा संदर्भातील याचिका फेटाळली. या स्मारकासाठी तब्बल 13 वर्षे न्यायालयीन संघर्ष करावा लागला, याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करून याचिका करतांना तुम्हाला दंड का करू नये, असा प्रश्न केला. एका महिन्यात भिडेवाडा रिकामा करून महापालिकेकडे हस्तांतरित करा, असा आदेश दिला. तसेच असे न केल्यास महापालिका जबरदस्तीने भूसंपादन करेल, असा इशाराही देण्यात आला होता.
हिंदुस्थान समाचार
