नाशिक, ३ डिसेंबर, (हिं.स) – टोळीयुद्धातून २०२० च्या अखेरीस इगतपुरी येथे कुख्यात संजय धामणे याचा खून करणाऱ्या डेव्हिड गँगचा म्होरक्या कुख्यात गुन्हेगार कवूभाई ऊर्फ फ्रान्सिक पॅट्रिक मॅनवेल याच्यावर पाेलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.
त्याच्या साथीदारांना २०२३ च्या सुरुवातीला इगतपुरी पोलिसांनी विक्रोळीतून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्यावर माेक्कान्वये कारवाई केली हाेती. डिसेंबर २०२० मध्ये इगतपुरी येथे संजय बबन धामणे (रा. देवळाली गाव, नाशिक रोड) याचा खून करण्यात आला.
याप्रकरणी संशयित आशा पॅट्रिक मॅनवेल हिला तेव्हाच पोलिसांनी अटक केली होती, तर सायमन पॅट्रिक मॅनवेल ऊर्फ छोटा पापा (वय २२) आणि अजय पॅट्रिक मॅनवेल ऊर्फ आज्या (वय २७, दोघे रा. गायकवाडनगर, इगतपुरी), अजय ऊर्फ टकल्या राजू पवार (रा. बजरंगवाडी, इगतपुरी) यांच्यावर यापूर्वीच मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे.
दरम्यान, फरारी असलेल्या डेव्हिड गँगच्या सदस्यांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक उमाप यांनी दिले होते. त्यानुसार इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील यांच्या पथकाने संशयितांना अटक केली होती. या गुन्हेगारांचे सतत गंभीर स्वरुपाचे कृत्य सुरू असल्याने त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीमुळे मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. दरम्यान, संशयित छोटा पापाचा भाऊ डेव्हिड याचा मयत संजय धामणेच्या गटाने खून केला होता.
वर्चस्ववादातून झालेल्या या हत्येनंतर कारागृहातून धामणे काही दिवसांसाठी बाहेर आला. त्यावेळी छोटा पापा, त्याची बहीण, भाऊ, आई व इतर तीन संशयितांनी मिळून संजय धामणेचा खून केला. टाेळीयुद्धातून हे कृत्ये सुरू असल्याने इगतपुरीतील नागरिक दहशतीखाली हाेते. मात्र, या कारवाईमुळे इगतपुरी परिसर दहशत मुक्त हाेण्याच्या मार्गावर आहे.
हिंदुस्थान समाचार
