दहशतवादी कारवायांमध्ये होता कर्मचाऱ्यांचा सहभाग
बडतर्फ कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक, पोलिस व डॉक्टरचा समावेश
श्रीनगर, 22 नोव्हेंबर (हिं.स.) : दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या 4 कर्मचाऱ्यांना जम्मू-काश्मीर सरकारने बडतर्फ केलेय. यामध्ये एक डॉक्टर, शिक्षक आणि पोलिस हवालदाराचा सहभाग आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून एक डॉक्टर, एक पोलीस कॉन्स्टेबल, एक शिक्षक आणि उच्च शिक्षण विभागातील प्रयोगशाळा प्रभारी अशा 4 सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. पोलीस आणि तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकारने भारतीय राज्यघटनेच्या कलम 311 च्या कलम (2) च्या उपकलम (सी) नुसार चार सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. यापूर्वी 10 जुलै 2021 रोजी आंतरराष्ट्रीय दहशतवादी सय्यद सलाहुद्दीनच्या 2 मुलांसह 11 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. सर्व कर्मचारी दहशतवादी फंडिंग, फुटीरतावाद आणि दहशतवाद्यांना आश्रय देणे यासारख्या देशविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले आढळले होते.यापूर्वी 31 मार्च रोजी लेफ्टनंट गव्हर्नर प्रशासनाने 2 पोलिस कॉन्स्टेबल आणि एका शिक्षकासह 5 सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते.
हिंदुस्थान समाचार
