लासलगाव, २१ नोव्हेंबर, (हिं.स)-नाशिक जिल्ह्यात कुसुम सोलर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप देण्यात यावा या मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण कार्यालयाच्या (महाऊर्जा) नाशिक विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांना काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी दिले आहे
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र सरकार मिळून 90 ते 95 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना सौरपंप दिले जातात याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो.सौर पंपामुळे विजेची बचत होते,शेतकऱ्यांचा विजेचा खर्च शून्य होतो या याशिवाय पर्यावरण देखील सुरक्षित राहते.सरकारकडून या योजनेसाठी अल्प आणि ठराविक वेळात ऑनलाईन फॉर्म भरण्याची पद्धत असते अत्यंत कमी वेळात हे फॉर्म भरुन शेतकऱ्यांना नाव नोंदणी करावी लागते नाव नोंदणीसाठी देखील शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो त्यानंतर काही महिन्यांमध्ये सौर पंप शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावर बसून दिले जातात.नाशिक जिल्ह्यामध्ये साधारण एक वर्षापासून नाव नोंदणी केलेल्या एकाही शेतकऱ्याला सौरपंप वितरित केला गेला नाही ही बाब लक्षात घेता नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस,कृषितज्ञ,शेतकरी नेते सचिन आत्माराम होळकर यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण कार्यालयाच्या (महाऊर्जा) नाशिक विभागीय महाव्यवस्थापक यांना याबाबत निवेदन देवून याबाबत सविस्तर चर्चा केली.
सौरपंप मिळण्यासाठी साधारण वर्षापूर्वी फॉर्म भरलेल्या हजारो शेतकऱ्यांनी फॉर्म भरल्यानंतर त्यांना फक्त एका मेसेज व्यक्तिरिक्त कोणताही प्रतिसाद शासनाकडून देण्यात आला नाही त्यामुळे अनेक शेतकरी याबाबत संभ्रमावस्थेत आहे.नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सौर पंपाची गरज लक्षात घेता तात्काळ शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सौर पंप उपलब्ध करून ते कार्यान्वित करून द्यावे याबाबतची मागणी काँग्रेस नेते सचिन होळकर यांनी निवेदनात केली आहे.
हिंदुस्थान समाचार
