नाशिक, २१ नोव्हेंबर, (हिं.स.) :- शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.
आत्महत्येचा पहिला प्रकार शिवाजीनगर येथे घडला. मनोज संजय बोरसे (वय ४०, रा. तुळजाई निवास, जिजामाता कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) यांनी राहत्या घरी अज्ञात कारणातून बेडरूमच्या छतास असलेल्या लोखंडी हुकाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांचे वडील संजय बोरसे यांनी त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्येचा दुसरा प्रकार राणेनगर येथे घडला. चेतन दगाजी शेवाळे (वय ३२, रा. स्वामी विवेकानंद चौक, गणपती मंदिरामागे, राणेनगर) या तरुणाने राहत्या घरातील हॉलमध्ये असलेल्या सिलिंग फॅनच्या कडीला उपरण्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिंदुस्थान समाचार
