श्रीनगर, 13 नोव्हेंबर (हिं.स.) : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील शारदा मंदिरात दिवाळी साजरी करण्यात आली आहे. राज्याच्या कुपवाडा जिल्ह्यातील टिटवाल येथे असलेले शारदा मंदिर एलओसीला लागून आहे. या मंदिरात 75 वर्षात पहिल्यांदाच दिवळीची पूजा करण्यात आल्याची माहिती ‘सेव्ह शारदा कमिटी’चे संस्थापक रवींद्र पंडिता यांनी सांगितले.
शारदा मंदिरात दिवाळीच्या निमित्त आयोजित पूजेला 104-विजय शक्ती ब्रिगेडचे कमांडर कुमार दास आणि सेव्ह शारदा समितीचे प्रमुख रवींद्र पंडिता उपस्थित होते.यावेळी त्रिभोणी गावातील स्थानिक लोक आणि शीख बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सत्यनारायणाची पूजा करून उपस्थितांना मिठाई वाटण्यात आली. याप्रसंगी स्थानिक तहसीलदार तंगधर इयाद कादरी, डॉ.संदीप मावा, शारदा समिती सदस्य एजाज खान, इफ्तिखार, निवृत्त कॅप्टन इलियास, हमीद मीर व त्रिभोणीचे शिख उपस्थित होते. देशाच्या फाळणीपूर्वी येथे एक मंदिर आणि गुरुद्वारा होता, जिथे 1947 पर्यंत दिवाळी साजरी केली जात होती. त्यानंतर जिहादींनी मंदिर आणि गुरुद्वारावर हल्ला करून ते जाळले. त्यानंतर तिथे पुन्हा कधीच दिवाळी साजरी झाली नाही, पण आता 75 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली. डिसेंबर 2021 मध्ये या भूमीवर पारंपारिक पूजा करण्यात आली. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सेवा शारदा समितीने मंदिर बांधकाम समिती स्थापन केली. या समितीत तीन स्थानिक मुस्लिम, एक शीख आणि एक काश्मिरी पंडित यांचा समावेश होता.
हिंदुस्थान समाचार
