नाशिक, ०७ नोव्हेंबर : उत्तर महाराष्ट्रातील आरोग्यसेवेत अल्पावधीतच नावलौकिक मिळालेले नाईन पर्ल्स हॉस्पिटल येथे पहिलीच विरुध्द रक्तगटाच्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली अशी माहिती हॉस्पिटलचे संचालक-किडनीविकार व प्रत्यारोपण तज्ञ डॉ.नागेश अघोर यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून नाईन पर्ल्स येथे डॉ.अघोर यांच्याकडे ओ निगेटिव्ह रक्तगटाचे रुग्ण (वय वर्षे ४४) हे आपली दोन्ही किडनी कायमची निकामी झाली असल्याने उपचार घेत होते त्यादरम्यान त्यांचे डायलिसिस देखील चालू होते. त्यावर रुग्णाला डॉ यांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. कायद्यानुसार रुग्णाच्या जवळील नातेवाईकांपैकी किडनीदान करणे आवश्यक असते प्रत्यारोपण करताना जवळच्या नातेवाईकांपैकी ज्यांचा रक्तगट समान आहे, अशा एका व्यक्तीची किडनी प्रत्यारोपित केली जाते. मात्र या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये रक्तगट जरी समान होता; तरी आई, वडील हे वैद्यकीयद्रुष्ट्या शस्त्रक्रियेस योग्य नसल्याने आणि बहीण,भावाच्या वैयक्तिक कारणामुळे त्यांची किडनी प्रत्यारोपित करणे शक्य नव्हते. रुग्णाच्या पत्नीने पतीला किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, तिचा रक्तगट ‘बी पॉझिटिव्ह’ होता. रक्तगट भिन्न असल्याने किडनी प्रत्यारोपणात अडचणी होत्या. यावर प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे विरुध्द रक्तगटाच्या अवयवदाता कडूनही किडनी घेता येते अशी माहिती डॉ. अघोर यांनी रुग्णाच्या कुटुंबियांना दिली. त्यावर रुग्णाच्या पत्नीने पुढाकार घेऊन विरुध्द रक्तगट असलेली किडनी आपल्या पतीला दान करण्याचे ठरवले व लगेचच निर्णय घेऊन डॉ.अघोर यांच्या मार्गदर्शना खाली सर्व आवश्यक चाचण्या व कायेदशीर प्रकिया पार पाडत नवरात्रीच्या शुभ कालवधीत शस्त्रक्रिया करण्याचे योजिले. नियोजननुसार किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
