कोलकाता, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे एकदिवसीय विश्वचषक सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. आजच्या सामन्यात विराट कोहलीने ४९ वे शतक ठोकले. त्यामुळे विराटला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
विश्वचषकात भारताने ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला. या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे.
कोलकातातील ईडन गार्डनवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. भारताची सुरुवात खूपच आक्रमक झाली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिलने आफ्रिकेच्या गोलंदाजांवर धावा बोलत पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक ९० धावा केल्या. मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित ४० धावा करून बाद झाला. रोहित शर्माने शुबमन गिलसह ३५ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. रोहित २४ चेंडूत ४० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि दोन षटकार मारले.
शुबमन गिल २४ चेंडूत २३ धावा करून बाद झाला. आपल्या खेळीत त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावला. ९३ धावांवर दोन विकेट्स पडल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी १३४ धावांची भागीदारी केली. श्रेयस ८७ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून बाद झाला. केएल राहुल काही विशेष करू शकला नाही आणि त्याला केवळ आठ धावा करता आल्या. सूर्यकुमार यादवने १४ चेंडूंत पाच चौकारांच्या मदतीने जलद २२ धावा केल्या.
हिंदुस्थान समाचार
