काठमंडू, 04 नोव्हेंबर : नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 11.32 वाजता 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळमधील काठमांडूच्या वायव्येस 331 किलोमीटर अंतरावर 10 किलोमीटर भूमिगत होते. या भूकंपामुळे मरणाऱ्यांची संख्या आज, शनिवार सकाळपर्यंत 132 झाली आहे.
नेपळच्या डीआयजी कुवीर कडायतेन यांनी दिलेल्या माहितीनुसार नेपाळमध्ये आलेल्या भूकंपाचा सर्वाधिक प्रभाव रकुम आणि जाजरकोट या 2 जिल्ह्यांमध्ये दिसून आला. रुकुम पश्चिममध्ये 38 तर जाजरकोटमध्ये 94 जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपात आतापर्यंत 150 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि बिहारची राजधानी पटना येथे भूकंपाचे धक्के जाणवले. भारतात भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मध्य प्रदेशातील भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर, सतना आणि रीवा येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. राज्यातील आगर माळवा आणि मुरैना जिल्ह्यांतील काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारमध्ये पाटणा, आराह, दरभंगा, गया, वैशाली, खगरिया, सिवान, बेतिया, बक्सर, बगहा, नालंदा, नवादा यासह 11 जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. तर उत्तरप्रदेशात लखनऊ, गाझियाबाद, आग्रा, कासगंजसह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी तिन्ही सुरक्षा यंत्रणांना बचाव कार्यात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भूकंपामुळे झालेल्या हानी बद्दल दुख: व्यक्त केले आहे.
