वॉशिंग्टन , 02 फेब्रुवारी (हिं.स.)।ग्रॅमी पुरस्कारांच्या मंचावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणावर तीव्र टीका करण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक, कॉमेडियन ट्रेवर नोआ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवली. या मंचावर झालेल्या टोमण्यांमुळे ट्रम्प नाराज झाले असून, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेवर नोआवर टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
या वर्षीच्या ग्रॅमी पुरस्कारांचे सूत्रसंचालन ट्रेवर नोआ करत होते. पुरस्कार सोहळ्यात त्यांनी ट्रम्प यांच्यावर उपरोधिक टिप्पणी करत काही वादग्रस्त विधानं केली. यामुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांनी ट्रेवर नोआला ‘लूझर’ असे संबोधले.डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या एक्स खात्यावर लिहिले,“ट्रेवर नोआने माझ्याबद्दल खोटे विधान केले आहे. त्याने म्हटले की डोनाल्ड ट्रम्प आणि बिल क्लिंटन यांनी एपस्टीन आयलंडवर वेळ घालवला. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी बिल क्लिंटनबद्दल बोलू शकत नाही, पण मी कधीही एपस्टीन आयलंडवर गेलो नाही.”
ते पुढे म्हणाले, “अशा खोट्या आणि बदनामीकारक आरोप माझ्यावर बनावट बातम्या देणाऱ्या मीडियानेही कधी केले नाहीत. ट्रेवर नोआ हा पूर्णपणे लूझर आहे. त्याने आधी तथ्य तपासावीत. असे दिसते की या टॅलेंटलेस आणि मूर्ख व्यक्तीविरोधात मी माझ्या वकिलांना पाठवणार आहे.त्याच्यावर कोट्यवधी डॉलर्सचा दावा ठोकणार आहे. तयार रहा नोआ, मी तुझ्याशी थोडा ‘मजा’ करणार आहे.”
दरम्यान, ग्रॅमीच्या मंचावर ट्रेवर नोआ यांनी सर्वप्रथम गायिका बिली आयलिश हिला ‘सॉन्ग ऑफ द इयर’ पुरस्कारासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ट्रम्प यांच्यावर टोला लगावत ते म्हणाले, “हा आहे सॉन्ग ऑफ द इयर. अभिनंदन बिली आयलिश. हा असा ग्रॅमी आहे, जो प्रत्येक कलाकाराला हवा असतो—जवळजवळ तितकाच, जितका ट्रम्पना ग्रीनलँड हवा आहे. आणि हे समजण्यासारखे आहे, कारण एपस्टीन गेल्यानंतर त्यांना बिल क्लिंटनसोबत फिरण्यासाठी एका नव्या आयलंडची गरज आहे.” याच टिप्पणीमुळे डोनाल्ड ट्रम्प प्रचंड संतप्त झाले आहेत.
—————
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode
