एनसीईआरटीच्या पॅनलने घेतला निर्णय
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर (हिं.स.) : एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये आता ‘इंडिया’ऐवजी भारत असा बदल करण्यात येणार आहे. एनसीईआरटीच्या पॅनेलने सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या ऐवजी भारत असा नाम बदलाचा प्रस्ताव एकमताने स्वीकारला आहे. या बदलानंतर आता विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्ये भारत हा शब्द शिकवला जाणार आहे.
‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग’कडे (एनसीआरटी) देखील त्यांच्या अभ्यासक्रमातून, पाठ्यपुस्तकातून इंडिया शब्द हटवून त्याजागी भारत शब्द घेण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. याबाबत एनसीईआरटीच्या पॅनेलमधील एका सदस्याने सांगितले की, आमच्या पुस्तकांच्या पुढील संचामध्ये इंडिया हे नाव बदलून भारत केले जाईल. हा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी ठेवण्यात आला होता, तो आता मान्य करण्यात आला आहे. समितीने पाठ्यपुस्तकांमध्ये ‘प्राचीन इतिहास’च्या जागी ‘शास्त्रीय इतिहास’ समाविष्ट करण्याची शिफारस केली. इतिहासाची यापुढे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली जाणार नाही, कारण भारत हे एक जुने राष्ट्र आहे आणि ब्रिटिश साम्राज्यवादाबद्दल अनभिज्ञ आहे.
‘इंडिया’ऐवजी भारत असे नाव बदलण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी केली होती. आता ती मागणी मान्य करण्यात आली आहे. संस्थेकडून इंडिया हे नाव वगळून भारत हा शब्द वापरण्यात येईल का याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. त्यावरुन सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांकडून अनेक मतमतांतरं समोर आली होती. जी-20 बैठकीच्या वेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला उल्लेख प्रेसिडेंट ऑफ इंडिया असा न करता प्रेसिडेंट ऑफ भारत असा केला होता.
हिंदुस्थान समाचार
