नाशिक, १६ ऑक्टोबर, (हिं.स.) : प्रत्येकाला अन्नाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिवस साजरा करण्यात येतो.या अनुषंगाने टॉपर्स अकॅडमी व कॅटलिस्ट कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने लासलगाव शहरात ”कुकिंग विथाऊट फायर” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.टॉपर्स अकॅडमीचे संचालक प्रा क्षीरसागर,प्रा रोहित वाकचौरे,नवले मॅडम,प्रा रायते,प्रा शिंदे व इतर शिक्षकवृंद यांच्या मार्गदर्शनाने सर्व विद्यार्थ्यांनी शेगडी,गॅस इ.ज्वालाग्राही साधनांचा वापर न करता संतुलित व पौष्टिक अन्नपदार्थ बनविले. मर्यादित वेळेत आरोग्याच्या दृष्टीने सकस अन्नपदार्थ बनवून उत्तम सादरीकरण करत त्याबाबतचे महत्त्व विद्यार्थ्यांनी विशद केले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नुतन विद्या प्रसारक मंडळ इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक प्रा.सत्तार शेख उपस्थित होते.एसएनडी औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या प्राचार्या संचेती,सरस्वती विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका पाटील व आरोग्य विषयक सल्लागार व आहारतज्ञ सुर्यवंशी मॅडम यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले.स्वच्छता,शुद्धता,सादरीकरण व पौष्टिकता या सर्व मापदंडांच्या आधारे गुणांकन करुन प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्पर्धेत पालक प्रतिनिधी म्हणून कैलास उपाध्ये यांच्या समवेत सर्व पालकवृंद उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या अन्नपदार्थांचे वाटप करण्यात आले.
लासलगाव शहरातील गौरवशाली शैक्षणिक परंपरेची जोपासना करण्यासोबतच विविध खाद्यसंस्कृतीचे व अन्नाचे महत्त्व पटवून देण्यासाठी टॉपर्स अकॅडमी अश्या स्पर्धांचे आयोजन करत असते.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी व सजग नागरिक बनवण्यासाठी अश्या प्रकारच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी टॉपर्स अकॅडमी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन प्रा क्षीरसागर यांनी केले.उपस्थित मान्यवरांचे तसेच पालकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानत प्रा दुसाने यांनी व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार
