पुणे 7ऑक्टोबर : भुकूम (ता. मुळशी) येथील वृंदावन भरेकर देशी काऊ फार्ममध्ये जर्सी गाईच्या गर्भातून देशी गोवंश निर्मिती केली आहे. येथील देशी गीर गाईचे बीज आणि ब्राझील येथील गीर बैल इस्पांड्रॉ याचे शुक्राणू याचा वापर करून त्याचा एंब्रीयो तयार करून तो जर्सी गायीच्या गर्भामध्ये सोडला गेला. त्यापासून गीर या देशी गायीच्या वंशाची निर्मिती झाली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वृंदावन देशी काऊ फार्मचे संचालक अण्णा भरेकर व किरण भरेकर यांनी सांगितले की, आयव्हीएफ (इन्व्हिट्रो फर्टिलायझेशन अॅंड एंब्रियो ट्रान्फर) या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रयोग केला आहे. सध्या जर्सी गाईपासून कालवड जन्माला आली असून, ती पूर्ण शंभर टक्के देशी गीर वाणाची आहे. त्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे मार्गदर्शन घेण्यात आले होते.
भुकूम येथील फार्ममध्ये केवळ देशी गायींचे संगोपन केले जात आहे. या फार्ममध्ये सध्या शंभरहून अधिक देशी गोवंश आहेत. त्यात गीर, साहिवाल, थारपारकर तसेच पोंगनूर आदी वाणांचा समावेश आहे. सात वर्षांपूर्वी येथील जर्सी गायीपासून थारपारकर या देशी गोवंशाची निर्मिती केली होती. ही गाय सध्या दोन वेळेचे मिळून पंधरा ते सोळा लिटर दूध देते. येथील साहिवाल जातीची देशी गाई बावीस लिटर दूध देते.
